शिंदे गटात मंत्रिपदावरून नाराजीचे वारे? कडूंना कॅबिनेट, शिरसाटांनाही व्हायचेय? केसरकर म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 09:46 PM2022-07-01T21:46:10+5:302022-07-01T21:47:02+5:30
संजय राऊतांनी राजीनामा द्यावा मगच बोलावे, त्यांना काय माहितीय शरद पवार माझे संबंध, पवारांनीच मला शिकवलेय असे केसरकर म्हणाले.
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळाल्याने आम्हाला सुखद धक्का बसला आहे. हे पंतप्रधान मोदी, शहा, नड्डा आणि देवेंद्र फडणवीसांमुळे झाले आहे. फडणवीसांनी सत्तेचा त्याग केला, उद्धव ठाकरे हो मोठे नेते आहेत, त्यांना वेळ आल्यावर उत्तर देऊ, अशा शब्दांत शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी गेल्या दोन दिवसांतील घडामोडींची माहिती दिली आहे.
आमच्यामध्ये कोणीही नाराज नाही. शिंदे गटामध्ये मंत्रिपदावरून नाराजी असल्याचे बोलले जात आहे. तसे काही नाही. आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलो आहोत. यामुळे शिंदेंनी आम्हाला आपल्या कोणालाही मंत्रिपद मिळणार नाही असे जरी सांगितले तरी एकही आमदार मंत्री झाला नाही तरी शिंदेंसोबत असेल, असे म्हणत नाराजीच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
शिंदे गटात बच्चू कडू यांनी आपल्याला राज्यमंत्री पद नको तर कॅबिनेट मंत्री पद हवेय अशी मागणी केल्याची चर्चा आहे. तर औरंगाबादमधील संजय शिरसाट यांनाही मंत्रीपद हवे आहे, त्यावरून ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावर केसरकर यांनी खुलासा केला.
देवेंद्र फडणवीस यांच्याकाळातील काही योजना बंद पडल्या होत्या. जलयुक्त शिवार ही शेता शेतात पाणी पोहोचविण्याची योजना होती, ती त्यांनी सुरु केली आहे. योजना अंमलात येत असताना काही चुका होतात, त्याचा दोष प्रमुखावर कसा देता येईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संजय राऊतांनी राजीनामा द्यावा मगच बोलावे, त्यांना काय माहितीय शरद पवार माझे संबंध, पवारांनीच मला शिकवलेय असे केसरकर म्हणाले.