पोलिसांची शिस्त राष्ट्रीय साहित्य संमेलनाला लाजविणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 05:51 AM2019-02-26T05:51:03+5:302019-02-26T05:51:07+5:30

महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने पहिल्यांदाच भरविलेले ‘दक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य संमेलन २०१९’ हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात उत्साहात पार पडले.

Dissent of Police Discipline National Literature Conference | पोलिसांची शिस्त राष्ट्रीय साहित्य संमेलनाला लाजविणारी

पोलिसांची शिस्त राष्ट्रीय साहित्य संमेलनाला लाजविणारी

Next

मुंबई : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता राबणाऱ्या पोलिसांनी पहिल्याच साहित्य संमेलनाचे अतिशय नेटके संयोजन केले आहे. अशी शिस्त मला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कधी पाहावयास मिळाली नाही, अशी स्पष्ट कबुली ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांनी सोमवारी येथे दिली.


महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने पहिल्यांदाच भरविलेले ‘दक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य संमेलन २०१९’ हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात उत्साहात पार पडले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस उपमहानिरीक्षक तथा संमेलनाध्यक्ष डॉ. बी.जे. शेखर, नागपूर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे आदी उपस्थित होते.


नायगावकर म्हणाले, ‘पोलिसांच्या साहित्यातून समाजाची वास्तविकता समोर येते. संमेलन भरवण्याचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्यातील शिस्त अन्य साहित्य संमेलनांच्या आयोजकांनी घेतली पाहिजे.’
गृहराज्यमंत्री केसरकर म्हणाले, ‘पोलिसांचे भावविश्व व संवेदना समाजासमोर याव्यात. त्यांच्यातील अभिजात कलेबरोबरच समाजातील घटकांशी सुसंवाद घडवून समाजामध्ये एकोप्याचे वातावरण निर्माण व्हावे.’


महासंचालक पडसलगीकर म्हणाले, ‘लिखाणाची सुरुवात प्रत्येक पोलीस ठाण्यात केसेस लिहिण्यातून होते. पण त्याच्या कलेनुसार त्यांनी लिहिलेले लेखन या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बाहेर आले आहे. आपली सेवा सांभाळत काही ना काही लिहितो, हेच आमचे यश आहे. ताणतणाव कमी करण्यासाठी त्यांच्यातील भावना, इच्छा जपण्यासाठी भरविलेले हे ऐतिहासिक संमेलन आहे. यापुढेही अशा प्रकारचे संमेलन सुरू ठेवण्यात येईल, असे सांगितले.
ठाणे ग्रामीणचे अधीक्षक शिवाजी राठोड यांनी पोलीस शौर्यगीत गायले. दुपारच्या सत्रात ‘मानसिक ताणतणाव, सामाजिक दायित्व आणि पोलीस साहित्यांचे वैचारिक मूल्य’ या विषयावरील चर्चासत्रात नागपूरचे आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी अनेक प्रसिद्ध शायरी सादर करीत पोलिसांच्या परिस्थितीचे अचूकपणे विवेचन केले.

पोलीस मुख्यालयातून दिंडी : संमेलनाच्या सुरुवातीला कुलाब्यातील पोलीस मुख्यालयापासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानपर्यंत दिंडी काढण्यात आली. त्यामध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी, साहित्यिक सहभागी होते. यावेळी कॉन्स्टेबल वारकऱ्याच्या वेशात सहभागी झाले.

गझल मुशायºयाने संमेलनाची सांगता
दिवसभर विविध सत्रांत रंगलेल्या संमेलनामध्ये अनेक आजी-माजी पोलीस सहभागी झाले होते. रात्री कविता, गझल व मैफलीचा कार्यक्रम रंगला. ‘पीसीआर’चे महानिरीक्षक कैसर खालिद यांनी स्वत: लिहिलेल्या गझल सादर करीत उपस्थितांना थक्क केले. त्यांच्यासह महानिरीक्षक कृष्णप्रकाश, उपमहानिरीक्षक दत्ता कराळे, अधीक्षक अशोक मोराळे यांनी काव्य सादर करीत उपस्थितांची दाद मिळविली.

Web Title: Dissent of Police Discipline National Literature Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.