डॉक्टरवरील कलंक पुसला

By admin | Published: April 7, 2017 05:36 AM2017-04-07T05:36:38+5:302017-04-07T05:36:38+5:30

डॉ. जयश्री उज्ज्वल इंगोले यांच्याविरुद्ध २० वर्षांपूर्वी दाखल झालेला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला.

Dissolve the doctor's stigma | डॉक्टरवरील कलंक पुसला

डॉक्टरवरील कलंक पुसला

Next


मुंबई : निष्काळजीपणाने एका अपघातग्रस्त रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल अमरावती येथील सरकारी इरविन रुग्णालयातील एक तत्कालीन सर्जन डॉ. जयश्री उज्ज्वल इंगोले यांच्याविरुद्ध २० वर्षांपूर्वी दाखल झालेला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला.
आपल्याविरुद्धच्या निष्काळजीपणाच्या आरोपात काही तथ्य नसल्याने खटला रद्द करावा, यासाठी डॉ. इंगोले यांनी केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली होती. त्याविरुद्ध डॉ. इंगोले यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेले अपील न्या. मदन बी. लोकूर व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने मंजूर करून खटला रद्द केला. या प्रकरणाची तथ्ये पाहता डॉ. इंगोले यांनी भादंवि कलम ३०४ए अन्वये गुन्ह्यासाठी अभिप्रेत असलेली कोणतीही बेछूट आणि निष्काळजीपणाची कृती केल्याचे दिसत नाही. फारतर परिस्थितीचा अंदाज घेण्यात त्या चुकल्या, असे म्हणता येईल, असा निर्वाळा न्यायालयाने दिला.
रस्ते अपघातात जखमी झालेल्या श्रीकृष्ण गवई नावाच्या व्यक्तीला इरविन रुग्णालयात २९ आॅगस्ट १९९७ रोजी दाखल केले गेले. त्याच्यावर उपचार सुरू होते व रक्त गोठत नसल्याने त्याच्या जखमा भरत नव्हत्या. ५ सप्टेंबर रोजी रात्री या रुग्णाच्या ओटीपोटात वेदना होऊ लागल्या म्हणून डॉ. मनोहर मोहेड यांनी डॉ. इंगोले यांना बोलावणे पाठविले. त्यानुसार त्या आल्या पण सर्जनने करण्यासारखे काही नव्हते म्हणून फिजिशियनने पाहावे, असा शेरा लिहून त्या निघून गेल्या. फिजिशियन डॉ. अविनाश चौधरी त्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळीही फिरकले नाहीत. त्याच दिवशी श्रीकृष्णचा मृत्यू झाल्यावर त्याच्या भावाने डॉक्टरांविरुद्ध निष्काळजीपणाची फिर्याद नोंदविली व त्यातून तीन डॉक्टरांविरुद्ध खटला दाखल झाला.
डॉ. इंगोले यांना ‘क्लीन चिट’ देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, फिजिशियन येण्याची वाट न पाहता त्या रात्री ११ वाजता इस्पितळातून निघून गेल्या हे खरे. पण फिजिशियन लवकरच येईल या अपेक्षेने त्यांनी निघून जाणे ही कदाचित त्यांची परिस्थितीचे आकलन करण्यात चूक झाली असे म्हणता येईल. त्या निघून गेल्यानंतर सकाळपर्यंत रुग्णाची प्रकृती आणखी खालावली व नर्सिंग स्टाफने पुन्हा बोलावूनही त्या आल्या नाहीत, असे काही घडले नाही. डॉ. इंगोले यांनी निष्काळजीपणा केला की नाही हे खटल्यात साक्षी-पुराव्यानेच सिद्ध होऊ शकेल, असे म्हणून उच्च न्यायालयाने खटला रद्द करण्यास नकार दिला होता.
परंतु सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, रुग्णावर उपचार करताना डॉक्टर आपल्या परीने सर्व प्रयत्न करत असतात, पण त्याला यश येईलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे डॉक्टरने उपचारांमध्ये हेळसांड केल्याचे आरोप तपासताना न्यायालयांनी अधिक काळजी घ्यायला हवी. (विशेष प्रतिनिधी)
>तिघांवर कारवाई
यासंदर्भात इरविन रुग्णालयाचे ड्युटीवरील तत्कालीन मेडिकल आॅफिसर डॉ. मनोहर मोहोड, डॉ. जयश्री इंगोले व फिजिशियन डॉ. अविनाश चौधरी अशा तीन डॉक्टरांविरुद्ध खातेनिहाय चौकशी केली गेली व त्यात त्यांच्यावर ठपका ठेवला गेला. डॉ. मोहोड यांच्या वार्षिक वेतनवाढी रोखल्या गेल्या, डॉ. इंगोले यांना इरविन इस्पितळात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली व डॉ. चौधरी यांची बदली केली गेली होती.

Web Title: Dissolve the doctor's stigma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.