Maharashtra Flood : आपत्तीग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण; छगन भुजबळ यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 01:26 PM2021-07-24T13:26:54+5:302021-07-24T13:29:14+5:30
Flood In Maharashtra : महापुरामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला. शेतकऱ्यांचंही झालंय प्रचंड नुकसान.
नाशिक :- महापुरामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी घरे अजूनही पाण्याखाली आहेत. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून राज्य शासनाकडून मोफत अन्न-धान्य आणि केरोसीनचे वाटप केले जाणार असल्याची माहीती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर या आपत्तीग्रस्त भागात मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. याबाबत आज तातडीने आदेश काढण्यात येणार असून आदेशाची वाट न बघता तातडीने मदत कार्य सुरु करण्यात यावे असे यावेळी छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. सहा पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये शिवभोजन थाळीचा इष्टांक दुप्पट करण्यात आला आहे. म्हणजेच या आपत्तीग्रस्त भागातील शिवभोजन केंद्रावर आत्ता दुप्पट क्षमतेने शिवभोजन थाळीचे वितरण केले जाणार आहे.
पुर परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यांत लाईट नाही अशा ठिकाणी मोफत केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी शिवभोजन केंद्र वाहून गेले आहे किंवा पाण्यात आहे तेथे इतर ठिकाणावरून शिवभोजनाचे पाकिटे वितरीत करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
पाकिटांच्या वितरणासाठी त्याचप्रमाणे लाईट नसलेल्या ठिकाणी किंवा शिवभोजन अॅपसाठी कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणी थाळीच्या नोंदणीसाठी स्थानिक पातळीवर तहसीलदारांनी त्यांच्या यंत्रणेचा वापर करावा अशा सुचना देण्यात आल्या आहेत, असे सांगून भुजबळ म्हणाले की, या सहा आपत्तीग्रस्त जिल्ह्यात प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि पाच लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे. ज्यांना गहू नको असेल त्यांना गव्हा ऐवजी तांदूळ दिले जातील. प्रत्येक कुटुंबाला ५ किलो डाळ देण्याबाबत सुद्धा निर्णय घेण्यात आला आहे, असेही भुजबळ म्हणाले.