शिवभोजन थाळी आता १४ जुलैपर्यंत मोफत, मुख्यमंत्र्यांचा गोरगरीब जनतेला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 01:45 PM2021-06-19T13:45:27+5:302021-06-19T13:46:24+5:30
Shiv Bhojan Thali : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन पाठवलेल्या नि:शुल्क थाळीच्या मुदतवाढीच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.
मुंबई : राज्यात सुरु असलेल्या 'ब्रेक द चेन' या प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे पॅकेज घोषित केले होते. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना १५ एप्रिलपासून शिवभोजन थाळीअंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था १४ जून २०२१ पर्यंत उपलब्ध करून दिली होती. ही मुदत आता आणखी एक महिन्यासाठी वाढवण्यात आली असून राज्यातील गरीब जनतेला दिनांक १४ जुलै २०२१ पर्यंत योजनेअंतर्गत मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध होईल. (Distribution of free Shiv Bhojan Thali extended till 14th July 2021)
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन पाठवलेल्या नि:शुल्क थाळीच्या मुदतवाढीच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत १५ एप्रिल ते १७ जून या काळात ९० लाख ८१ हजार ५८७ मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत ४ कोटी ७० लाख १८ हजार १८४ थाळ्यांचे वितरण झाले आहे.
#BreakTheChain अंर्तगत गरीब व गरजू जनतेसाठी जाहीर केलेल्या मोफत #शिवभोजन थाळी योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे. या मोफत थाळी योजनेचा ९० लाखांहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. तसेच आतापर्यंत ४ कोटी ७० लाख थाळ्यांचे वितरण झाले आहे. pic.twitter.com/0jPLnJ9iXb
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 18, 2021
राज्यात शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत ४४१ नवीन केंद्रांना मंजूरी देण्यात आली असून यामुळे प्रतिदिन थाळ्यांची संख्या ४४,३०० ने वाढली आहे. राज्यात आतापर्यंत १३३२ शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. नव्याने मंजूर केलेल्या ४४१ केंद्रापैकी काही केंद्रे सुरु झाली असून काही केंद्रे अल्पावधीतच सुरु होतील. आजघडीला राज्यात एकूण १०४३ शिवभोजन केंद्रे सुरु आहेत.