इन्फ्लुएंझाच्या प्रतिबंधासाठी १ लाखाहून अधिक लसींचे वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 09:39 AM2023-03-20T09:39:48+5:302023-03-20T09:40:42+5:30
सध्या गरोदर मातांसोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे.
मुंबई : राज्यात वाढत्या इन्फ्लूएंझाच्या प्रतिबंधासाठी शासनाने लसीकरण मोहिमेला गती देण्याचे निश्चित केले आहे. २०२२-२३ या वर्षामध्ये राज्यात एक लाख लसींचे वितरण करण्यात आले असून, आतापर्यंत त्यापैकी ९९, ७७८ जणांना ही मात्रा देण्यात आली आहे.
राज्यात सरकारतर्फे २०१५ पासून अतिजोखमीच्या व्यक्तीसाठी ऐच्छिक व मोफत इन्फ्लूएंझा लसीकरण उपलब्ध करण्यात येत आहे.
सध्या गरोदर मातांसोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. राज्य सरकारने एक लाख लसीच्या मात्रा खरेदी करून त्याचे मंडळनिहाय वितरण केले आहे. पुणे मंडळात सर्वाधिक ४३,११५ लसींच्या मात्रा वितरित करण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल ठाणे मंडळामध्ये २८, ४०० लसींच्या मात्रा देण्यात आल्या असून, त्यातील २८ हजार २५० जणांना मात्रा देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे नागपूर मंडळात ९ हजार ८५०, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४ हजार ८०० सर्व मात्रा देण्यात आल्या आहेत. तसेच नाशिक मंडळामध्ये ४ हजार ९५० पैकी ४ हजार ९४५ आणि लातूर मंडळामध्ये ६०५० पैकी ५९८३ मात्रा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. अकोला व कोल्हापूर मंडळात फक्त १४०० मात्रांचे वितरण झाले आहे.