मतदारांना मतदान चिठ्ठ्यांचे वाटप

By admin | Published: February 15, 2017 07:57 PM2017-02-15T19:57:36+5:302017-02-15T19:57:36+5:30

मतदानाचा टक्का वाढविण्याचे प्रयत्न

Distribution of voting papers to voters | मतदारांना मतदान चिठ्ठ्यांचे वाटप

मतदारांना मतदान चिठ्ठ्यांचे वाटप

Next

नाशिक : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदारजागृती अभियान राबविण्याचे निर्देश देण्याबरोबरच मतदारांना घरपोहोच मतदान चिठ्ठ्यांचे वाटप करण्याचेही आदेशित केले आहे. त्यानुसार, महापालिकेचे कर्मचारी प्रत्येक प्रभागातील मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान चिठ्ठ्यांचे वाटप करणार असून, गुरुवार (दि.१६) पासून वितरणास सुरुवात होणार असल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी व उपआयुक्त विजय पगार यांनी दिली.
महापालिका निवडणुकीसाठी यंदा १० लाख ७४ हजार मतदार आहेत. यंदा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विशेष लक्ष घातले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदारांपर्यंत त्यांच्या मतदान केंद्रांची माहिती जाऊन पोहोचावी याकरिता थेट मतदारांना मतदान चिठ्ठ्यांचे (व्होटर स्लीप) वाटप करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगामार्फत पहिल्यांदाच असा प्रयोग राबविला जात आहे. आजवर निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांसह संबंधित उमेदवारांकडूनच मतदारांना घरोघरी जाऊन मतदान चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत असे. मतदान चिठ्ठ्या आल्याशिवाय घराबाहेर न पडणारेही असंख्य मतदार आहेत. मतदान चिठ्ठ्यांच्या माध्यमातून मतदारांना प्रत्यक्ष मतदान केंद्र कोठे आहे आणि मतदार यादीतील आपला अनुक्रमांक किती आहे, याची माहिती घरबसल्या मिळते. त्यामुळे मतदान केंद्रावर गेल्यावर फारशी शोधाशोध करावी लागत नाही आणि रेंगाळावेही लागत नाही. मतदान करणे सोपे जाते. त्यासाठी यंदा निवडणूक आयोगच मतदान चिठ्ठ्या घेऊन मतदारांच्या घरी जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयाकडे मतदार चिठ्ठ्यांची जबाबदारी सोपविण्यात आली असून, वाटपासाठी घरपट्टी-पाणीपट्टी वसुली कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. प्रत्येक विभागात सुमारे १५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, गुरुवारपासून मतदान चिठ्ठ्यांचे वाटप केले जाणार असल्याचे विजय पगार यांनी सांगितले.

Web Title: Distribution of voting papers to voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.