जिल्हा प्रशासनाचे ‘फसवे’ नियोजन

By admin | Published: September 26, 2015 02:53 AM2015-09-26T02:53:31+5:302015-09-26T02:53:31+5:30

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रत्येक पर्वणीला कोटी भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून नियोजन करणाऱ्या पोलीस व जिल्हा प्रशासनाचे त्र्यंबकेश्वरच्या

District Administration's 'fraud' scheme | जिल्हा प्रशासनाचे ‘फसवे’ नियोजन

जिल्हा प्रशासनाचे ‘फसवे’ नियोजन

Next

नाशिक : तिसऱ्या व अंंतिम पर्वणीचे नियोजन पूर्णत:
फसले. बारा तासाहून अधिक काळ भाविकांना गैरसोयीच्या गर्तेत अडकवून ठेवण्याबरोबरच आबालवृद्धांना उन्हातान्हात तब्बल २४ किलोमीटरहून अधिक पायपीट करण्यास भाग पाडणाऱ्या प्रशासनाने गेल्या दोन पर्वण्यांकडे पाठ फिरविणाऱ्या व शेवटच्या पर्वणीला गर्दी करणाऱ्या भाविकांवर एक प्रकारे सूडच उगविला.
बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी व पाठोपाठ चौथा शनिवार, रविवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्यांमध्येच त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याची तिसरी व अंतिम पर्वणी असल्यामुळे भाविकांनी गुरुवारी सायंकाळपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत कुशावर्तात स्नानासाठी भाविकांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न फोल ठरला, नाशिककडून त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत वाढ होत असल्याचे पाहून प्रशासनाने रात्री दोन वाजेनंतर नाशिक-त्र्यंबक मार्गावरील खंबाळे येथील बाह्य वाहनतळावरून एसटी बस सोडण्यावरही निर्बंध लादले.
रात्री खंबाळे बाह्य वाहनतळ गाठलेल्या भाविकांना रात्रभर गैरसोयीचा सामना करत मुक्काम करावा लागला. सकाळ उजाडल्यावर एसटी बस कधी सुरू होतील याविषयी कोणतीही पूर्वसूचना एसटी वा जिल्हा प्रशासनाकडून दिली नसल्याने सकाळपासून भाविकांनी थेट रस्त्याचा ताबा घेत त्र्यंबकेश्वरकडे कूच केली. त्र्यंबकेश्वरमध्ये आखाड्यांचे शाहीस्नान सुरू असताना त्यात बाहेरगावाहून निघालेल्या भाविकांची भर पडल्याने पुरता गोंधळ उडाला. गल्लीबोळात बॅरिकेडिंग टाकून पोलिसांनी रस्त्यांची नाकाबंदी केली, त्यामुळे त्र्यंबकवासीयांनाही घराबाहेर पडणे मुश्कील झाले.
खंबाळे वाहनतळापासून पायपीट करत लाखोंच्या संख्येने निघालेल्या भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. १२ किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी कोणतीही सुविधा करण्यात आलेली नव्हती. आबालवृद्ध, कडेवर तान्हुले घेऊन निघालेल्या भाविकांना पिण्याचे पाणीदेखील मिळाले नाही. (प्रतिनिधी)
बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अखेरच्या पर्वणीत कुशावर्तात स्नान करून पुण्य पदरात पाडून घेण्याच्या विचारात असलेल्या भाविकांच्या पदरी मात्र हालअपेष्टाच पडल्या.
नाशिककडून त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांना पायपीट करावी लागली. तोच अनुभव पर्वणीच्या आदल्या दिवसापासून त्र्यंबकेश्वरी स्नानासाठी मुक्कामी राहिलेल्या भाविकांनाही प्रशासनाने दिला.
ज्या भाविकांनी रात्रीच स्नान आटोपून घेतले व ज्यांनी सकाळी आखाड्यांसोबत स्नान केले अशा भाविकांच्या परतीसाठी एसटी बसची सोय न करता त्यांनाही खंबाळे बाह्य वाहनतळापर्यंत पायपीट करण्यास भाग पाडले. रात्रभर जागरण केलेल्या भाविकांच्या शिव्याशापाचे धनी प्रशासनाला व्हावे लागले.

Web Title: District Administration's 'fraud' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.