जिल्हा बँकेचे केडर लवकरच बरखास्त : सहकारमंत्री
By admin | Published: February 16, 2017 07:04 PM2017-02-16T19:04:47+5:302017-02-16T19:04:47+5:30
जिल्हा बँकेचे केडर लवकरच बरखास्त : सहकारमंत्री
जिल्हा बँकेचे केडर लवकरच बरखास्त : सहकारमंत्री
सोलापूर : आॅनलाईन लोकमत
कोर्टबाजीत तरबेज असणाऱ्यांनी तालुक्याचे वाटोळे केले असून, सहकार शुद्धीकरणासाठी केडर बरखास्तीची कारवाई लवकरच केली जाणार आहे. विश्वास ठेवून कोणीही, कोठेही सह्या करून अडकू नका, असे आवाहन करीत संस्थांच्या माध्यमातून केलेले पाप सहा महिन्यात तुमच्यासमोर फेडायला लावणार असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलीप माने यांचे नाव न घेता मार्डी येथे बोलताना सांगितले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने उत्तर सोलापूर तालुक्यातील भाजपा-राष्ट्रवादी आघाडी उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मार्डी येथील यमाई मंदिरासमोर करण्यात आला. यावेळी सहकार मंत्री देशमुख यांनी दिलीप माने यांच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. प्रस्थापितांविरोधात आमची आघाडी असून तालुक्याची कीड काढण्यासाठी आघाडीचे सर्व उमेदवार विजयी करा, असे आवाहन देशमुख यांनी केले, सहकाराच्या शुद्धीकरणासाठी अभ्यास सुरू असून, लवकरच केडर बरखास्त केले जाणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले. सोलापूर बाजार समितीच्या कारभारात गंभीर दोष आढळल्यानेच संचालक मंडळ बरखास्त केले, आता पदे दुसऱ्यांना देऊन त्यांच्याकडून चुकीची कामे करुन घेतली जात असून, तालुक्यातील कोणीही चुकीच्या ठिकाणी सह्या करू नयेत, असे आवाहन देशमुखांनी केले. खासदार शरद बनसोडे यांनी माने यांचे नाव न घेता मालक तुम्हाला काहीही देत नसतो, कष्ट तुम्हालाच करावे लागते, माळढोकमधून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यात येत असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे यांना उभे करून पाडण्याचा, अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सतत झाल्याचा आरोप केला.
सहकारमंत्र्यांनी केडर बरखास्तीची कारवाई करावी, असे आवाहन साठे यांनी केले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी तालुक्यातील सीनेचे पाणी, शिरापूर उपसा सिंचन योजनेचा प्रश्न उपस्थित करीत तालुक्याचा कारभार पारदर्शक करण्यासाठी सत्ता द्या असे आवाहन केले. यावेळी काशिनाथ कदम, श्रीमंत बंडगर, प्रल्हाद काशिद, सुनील भोसले, जयदीप साठे यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर उमेदवार संध्याराणी इंद्रजित पवार, जितेंद्र शिलवंत, रजनी भडकुंबे, सुनील गुंड, वैजयंती साठे, जि.प. सदस्या ज्योती मार्तंडे, बेबीताई गाडेकर, अविनाश मार्तंडे, प्रवीण भालशंकर, इंद्रजित पवार, अमोल पाटील, शिवाजी पाटील, गणेश पाटील, जितेंद्र साठे, संभाजी भडकुंबे, शिवाजी सोनार आदींसह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.