जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई

By admin | Published: November 15, 2016 06:17 AM2016-11-15T06:17:48+5:302016-11-15T06:14:08+5:30

चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटा स्वीकारण्यास देशभरातील जिल्हा सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेने अचानक मनाई केली

District banks are not allowed to accept old notes | जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई

जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई

Next

अतुल कुलकर्णी / मुंबई
चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटा स्वीकारण्यास देशभरातील जिल्हा सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेने अचानक मनाई केली असून, सोमवारी दुपारी आलेल्या या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांची अडचण होणार आहे.
दरम्यान, राज्यातील ३१ जिल्हा बँकांमध्ये रविवारपर्यंत ५०० आणि १ हजाराच्या नोटांच्या रूपाने तब्बल ३ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर   प्रशासक मंडळ असले तरी बहुतेक जिल्हा बँकांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. ३१ जिल्हा बँकांच्या राज्यभरात ३७४६ शाखा आहेत. 
बहुसंख्य शेतकऱ्यांची खाती याच बँकांमध्ये आहेत. त्यामुळे जुन्या नोटा स्वीकारण्यास या बँकांवर बंदी आल्याने ग्रामीण भागातील परिस्थिती आणखी बिकट होणार आहे.
जिल्हा बँकांमध्ये काळा पैसा जमा होऊ नये म्हणून त्यावर बंदी आणल्याची चर्चा आहे. हा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता नसून देशभरातील जिल्हा बँकांना लागू आहे. 
जिल्हा बँकांवर बंदी आली असली तरी राज्य सहकारी बँकेला जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी आहे. तसेच बँकेच्या एकूण ३८ शाखांमधून रविवारच्या दिवशी बँक बंद होईपर्यंत तब्बल १७५ कोटी रुपये जमा झाले. 
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सर्वाधिक ६२५ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्याचप्रमाणे सर्वात कमी म्हणजे १२ कोटी रुपये यवतमाळ जिल्हा बँकेमध्ये जमा झाले आहेत, अशी माहिती राज्य बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी लोकमतशी बोलताना दिली.


कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत-
अहमदनगर, सातारा अशा काही जिल्हा बँकेत २०० ते २५० कोटी, सोलापूर जिल्हा बँकेत १८९ कोटी जमा झाले आहेत. कोणत्या बँकेत नेमकी किती रक्कम जमा झाली याची मोजणी सुरू असून, उद्या निश्चित आकडा मिळू शकेल, असे कर्नाड यांनी सांगितले.
राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून, तिच्या ३८ शाखा आहेत. तर ३१ जिल्हा बँकांच्या ३,७४६ शाखा आहेत. जिल्हा बँकांच्या एकूण कर्जदार सदस्यांची संख्या ४,९९,३३,११३ असून अर्बन को-आॅप बँकांची संख्या ५१६ आहे. त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शाखांची संख्या ४७६९ एवढी आहे. राज्य बँकेची स्वत:ची ६ एटीएम केंद्रे आहेत.


पाचशेच्या आणखी ५० लाख नोटा रवाना-
नाशिकरोड : चलार्थ पत्र मुद्रणालयात छापलेल्या पाचशे रुपयांच्या नव्या ५० लाख नोटा सोमवारी मुंबईला रिझर्व्ह बँकेकडे रवाना करण्यात आल्या. श्री गुरूनानक जयंतीची शासकीय सुटी असतानाही मुद्रणालयात काम सुरू होते. गेल्या शुक्रवारी तसेच सोमवारी प्रत्येकी ५० लाख नोटा येथून रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात आल्या. मुद्रणालयात २०, १०० रुपयांच्या नोटाही छापण्यात येत आहेत.

Web Title: District banks are not allowed to accept old notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.