जिल्हा बँकांच्या जुन्या नोटा वटणार, ३० दिवसांची मुदत!
By admin | Published: June 22, 2017 06:14 AM2017-06-22T06:14:33+5:302017-06-22T06:14:33+5:30
नोटाबंदीनंतर राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये जमा झालेले सुमारे २ हजार ७७१ कोटी मूल्याचे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली/मुंबई : नोटाबंदीनंतर राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये जमा झालेले सुमारे २ हजार ७७१ कोटी मूल्याचे बाद चलन अखेर रिझर्व्ह बँक स्वीकारणार आहे. त्यामुळे सात महिन्यांपासून पडून असलेल्या ५00 व एक हजारच्या नोटा वटणार असल्याने शेतीच्या पतपुरवठ्याची कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. रिझर्व्ह बँक २० जुलैपर्यंत जुन्या नोटा स्वीकारणार आहे.
८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर, जिल्हा सहकारी बँकांनी १३ नोव्हेंबरपर्यंत बाद नोटा स्वीकारल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांना या नोटा स्वीकारण्यास किंवा बदलून देण्यास बंदी केली होती.
ही कोंडी फोडण्यासाठी माजी केंद्रीय
कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राज्य सरकारने केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी दिशानिर्देश जारी केले.
शेतीसाठी लाभदायक निर्णय
केंद्राच्या निर्णयामुळे जिल्हा बँकांकडे पुरेसा अर्थपुरवठा होण्यास मदत होणार आहे. शेतीला फायदा होईल. जेटली आणि रिझर्व्ह बँकेचा मी आभारी आहे. आता सहकारी बँकांनी तातडीने शेतकऱ्यांना १० हजारांची उचल द्यावी.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
पतपुरवठ्याला गती
२७ जिल्हा बँकांमध्ये दोन हजार ७७१ कोटींचे जुने चलन जमा झाले होते. ते आता पुन्हा व्यवहारात येईल, त्यामुळे कृषी पतपुरवठ्याला गती येईल.
- प्रमोद कर्नाड, व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी बँक
होणार मोठा फायदा
चुकीच्या मार्गाने रक्कम जमा करणाऱ्यांवर कारवाई करा, पण बँकांना त्याचा फटका बसू देऊ नका, अशी मागणी केली होती. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
- सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री
संबंधित नोटा १० ते १३ नोव्हेंबर काळात जमा केल्या आहेत व त्या ठरवून दिलेल्या कालावधीत का जमा केल्या नाहीत? याचा समर्थनीय खुलासा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि पोस्ट कार्यालयासह अन्य व्यापारी बँकांना द्यावा लागणार आहे.
तीन दिवसांत जिल्हा बँकांमध्ये काळा पैसा पांढरा करण्यासाठी कोट्यवधी रुपये जमा झाल्याचा संशय व्यक्त झाला होता.
त्यामुळे विविध वित्तीय यंत्रणांनी नाशिक, जळगाव, कोल्हापूरसह बहुतांश जिल्हा बँकांमध्ये जुने चलन जमा झाल्याचा तपशीलही तपासला होता.
कोणत्या बँकेत किती रक्कम?
573 पुणे
341 नाशिक
315 सांगली
279 कोल्हापूर
209 जळगाव