राज्यातील जिल्हा बँकांही स्वीकारणार ५००, १००० च्या नोटा
By admin | Published: November 10, 2016 08:21 PM2016-11-10T20:21:17+5:302016-11-10T20:40:42+5:30
राज्यभरातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्विकाराव्यात असे आदेश रिझर्व्ह बँकेने गुरुवारी दिले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 10 - राज्यभरातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्विकाराव्यात असे आदेश रिझर्व्ह बँकेने गुरुवारी दिले आहेत. त्यामुळे या बँकांमध्ये पैसे भरण्यास लोकांची सोय झाली आहे. ग्रामीण महाराष्ट्रात जिल्हा बँकांचेच नेटवर्क भक्कम असल्याने या बँकातून नोटा न स्विकारण्याचा धोरणाबद्दल नाराजी व्यक्त होत झाली होती.
रिझर्व्ह बँकेने बुधवारी एक परिपत्रक काढून बँकींग व्यवहाराबध्दल सूचना दिल्या. त्यामध्ये अर्बन को-ऑप व स्टेट को-ऑप बँकांना ५०० आणि १००० च्या नोटा स्विकारता येणार नाहीत असे म्हटले होते. स्टेट को-ऑप बँकेचा अर्थ राज्य बँक असा घेवून राज्य बँकेच्या अधिका-यांनी सर्व जिल्हा बँकांना अशी कॅश स्विकारू नका असे तोंडी आदेश दिले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाने आम्ही तोंडी सूचना मान्य करणार नाही, लेखी द्यावे असा आग्रह धरला. तोपर्यंत थेट रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाशीही संपर्क साधून विचारणा करण्यात आली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने त्याबाबतची स्पष्टता केली. त्यामुळे पांचशे व एक हजार रुपयांच्या नोटा न स्विकारण्याचा प्रश्र्नच आला नाही. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकां ह्या रिझर्व्ह बँकेच्या बँकींग रेग्युलेशन अॅक्टनुसारच चालतात व त्यानुसारच त्यांना बँकींग परवाना मिळालेला असतो. त्यामुळे त्यांनी ५०० व १००० च्या नोटा स्विकारणे बंधनकारकच असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या जिल्ह्यांत १९१ शाखा असून त्यामधून सुमारे ६० कोटी रुपयांचा बॅलन्स असतो. परंतू रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणानुसार शंभर रुपयांच्याच नोटांचे वाटप करायचे असल्याने गुरुवारी कमी रक्कमेचे वाटप झाल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रतापसिंह चव्हाण यांनी सांगितले.