मंत्रालय प्रवेशासाठी जिल्हाप्रमुखांना मिळणार ग्रीन पास; सेनाभवनात उभारणार स्वतंत्र यंत्रणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 01:59 AM2020-03-09T01:59:52+5:302020-03-09T06:32:00+5:30
जिल्हाप्रमुखांकडून बैठका, मेळावे या माध्यमांतून शिवसैनिकांशी संवाद साधला जात आहे. काम कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती संबंधित शिवसैनिकाला मिळणार आहे.
प्रवीण देसाई
कोल्हापूर : शिवसैनिकांना एखाद्या कामासाठी मंत्रालय पातळीवर हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनाभवन येथे स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जिल्हास्तरावरून आलेली शिवसैनिकांची कामे सेनाभवन येथे स्वीकारून नंतर ती पुढील कार्यवाहीसाठी मंत्रालयात पाठविली जाणार आहेत. ‘सेनाभवन ते मंत्रालय’ असा सेतू तयार करून शिवसैनिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला आहे.
जिल्हाप्रमुखांकडून बैठका, मेळावे या माध्यमांतून शिवसैनिकांशी संवाद साधला जात आहे. काम कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती संबंधित शिवसैनिकाला मिळणार आहे. मंत्रालयातील कामे निर्गतीकरणाची जबाबदारी माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर देण्यात आली आहे.
जिल्हाप्रमुखांना ग्रीन पास
राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात कामासाठी येणाºया जिल्हाप्रमुखांनाही पासअभावी तिष्ठत राहावे लागते. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील त्यांचा प्रवेश सुकर होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून लवकरच सर्व जिल्हाप्रमुखांना ‘ग्रीन पास’ दिले जाणार आहेत.