जिल्हाधिका-यांनीही मान्य केला ईव्हीएममधील फेरफार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 07:34 PM2017-07-23T19:34:29+5:302017-07-23T19:34:42+5:30

माहिती अधिकारातून समोर आली बाब

The District Collector also agreed that the revision of the EVMs | जिल्हाधिका-यांनीही मान्य केला ईव्हीएममधील फेरफार

जिल्हाधिका-यांनीही मान्य केला ईव्हीएममधील फेरफार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होवून नारळ चिन्हावर बटन दाबल्यावर कमळ चिन्हासमोरील लाईट लागत होती. त्यामुळे मतदान रद्द करून पुन्हा मतदान घेण्यात आल्याची माहिती जिल्ह्याधिका-यांनी माहिती अधिकारांतर्गत दिली आहे.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोणार तालुक्यातील सुलतानपूर गावात मतदानादरम्यान ईव्हीएममधील फेरफारमुळे मतदार जेव्हा अपक्ष उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटन दाबत होते, तेव्हा भाजपच्या कमळ या चिन्हासमोरील एलईडी बल्ब लागत असल्याचा खुलासा माहिती अधिकाराच्या माध्यमातून  उघड झाल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. सलतानपूर जिल्हा परिषद सर्कलचे अपक्ष उमेदवार आशा अरूण झोरे यांनी १६ फेब्रुवारी रोजी मतदानादरम्यान होत असलेल्या या गोंधळाची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी झाली होती. यानंतर १६ जून रोजी गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत माहीतीचा अर्ज दाखल केला होता. याबाबत अनिल गलगली यांनी सांगितले की, बुलडाणाच्या जिल्हा निवडणूक विभागाकडून माहिती अधिकारांर्गत मिळालेल्या माहितीनुसार, लोणार तालुक्यातील सुलतानपूर गावात असलेल्या मतदान केंद्र क्रमांक ५६ वर एका मतदाराने जेव्हा मशिनवरील यादीतील उमेदवार क्र. १ ला असलेल्या अपक्ष उमेदवाराच्या नावापुढील नारळ या चिन्हापुढील बटन दाबले तेव्हा क्रमांक ४ वर असलेल्या भाजपच्या उमेदवाराच्या नावासमोरील दिवा लागला, यावरून हे मत भाजप उमेदवाराला गेले होते. याप्रकरणी आर्श्चयाची बाब म्हणजे याची तक्रार करणाऱ्या उमेदवार आशा झोरे यांनी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार घेण्यासच नकार दिला होता. मात्र, जेव्हा अनेक मतदारांनी याबाबत तक्रार केली तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास याबाबत तक्रार घेतली. आणि कारवाई करण्याआधी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या सहमती घेतली. यानंतर लोणारच्या निवडणूक अधिकाऱ्यांचे सहाय्यक स्वत: या केंद्रावर पोहोचले. त्यानंतर त्यांनीही याची पडताळणी करून खात्री करून घेतली. यामध्ये खरोखरच अपक्ष उमेदवाराचे मत हे भाजप उमेदवाराला जात होते. या निवडणूक क्षेत्रातून अनेक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर या केंद्रावरील मतदान रद्द करण्यात आले. मतदान केंद्र बंद करण्यात आले, फेरफार करण्यात आलेले ईव्हीएम मशिन सील करण्यात आले. त्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्यात आलेले अतिरिक्त मशीन या ठिकाणी लावण्यात आले. मात्र, राजकिय पक्षांनी फेरमतदानाची मागणी केली, त्यामुळे येथील मतदान रद्द करून अखेर २१ फेब्रुवारीला फेरमतदान घेण्यात आले. या प्रकारावरून ईव्हीएममध्ये फेरफार करता येणे शक्य असल्याचे गलगली यांनी म्हटले आहे. मात्र, असे प्रकार घडत असताना आणि त्यासाठी अनेक राजकीय पक्षांकडून ईव्हीएमसोबतच्या फेरफाराला आव्हान देऊनही निवडणूक आयोगाने नेहमीच अशा प्रकारच्या फेरफाराची शक्यता नाकारली आहे.

सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर "ईव्हीएम"संदर्भात वाद उफाळून आला होता. त्यानंतर देशातही "ईव्हीएम"विरोधात वादळ उठले. त्यानुषंगाने निवडणूक आयोगाने त्यातील दोष शोधून काढण्याचे आवाहन केले होते. लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे "ईव्हीएम"मध्ये घोळ झाला होता, हे बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पाठविलेल्या अहवालानंतर समोर आले आहे. "ईव्हीएम"मध्ये प्रचंड घोळ आणि हेराफेरी होत असल्याचे आता निवडणूक आयोगाने मान्य करावे.
- अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते, मुंबई.

Web Title: The District Collector also agreed that the revision of the EVMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.