जिल्हा रुग्णालय इमारतीचा भाग कोसळला
By admin | Published: February 27, 2017 04:04 AM2017-02-27T04:04:13+5:302017-02-27T04:04:13+5:30
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयामधील एचआयव्ही विभाग असलेल्या इमारतीच्या प्रवेशद्वारावरील कॉलमचा काही भाग रविवारी दुपारी कोसळला.
ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयामधील एचआयव्ही विभाग असलेल्या इमारतीच्या प्रवेशद्वारावरील कॉलमचा काही भाग रविवारी दुपारी कोसळला. सुदैवाने रविवार असल्याने हा विभाग बंद होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही इमारत ब्रिटिशकालीन असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
टेंभीनाका परिसरात जिल्ह्याचे जिल्हा रुग्णालय आहे. या रुग्णालयात जिल्ह्यातून गोरगरीब रुग्ण येत असल्याने नेहमी वर्दळ असते. त्यातच, या रुग्णालयाच्या परिसरात तीन ब्रिटिशकालीन इमारती असून त्यातील एका इमारतीत एचआयव्ही विभाग २००७ मध्ये सुरू करण्यात आला आहे.
येथील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची नेहमी गर्दी असते. या इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या कॉलमचा काही भाग रविवारी दुपारी अचानकपणे कोसळला. त्यातच, कोसळलेल्या स्लॅबच्या तुकड्यामुळे या विभागाच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर लावलेल्या ग्रॅनाइटच्या लाद्यांचे तुकडे झाले आहेत. या इमारतीच्या आतील भागातील स्लॅबचा काही भाग एकदोन वेळा पडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
>इमारतीचा काही भाग कोसळला; पण यामध्ये कोणतीही हानी झालेली नाही. याबाबत, सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती देऊन लवकरात लवकर दुरुस्तीचे काम हाती घेण्यास सांगितले आहे.
- सी.बी. केम्पीपाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे जिल्हा सामान्य रु ग्णालय