जिल्हा रुग्णालयाला हवेत ५० सुरक्षारक्षक
By admin | Published: April 5, 2017 03:36 AM2017-04-05T03:36:28+5:302017-04-05T03:36:28+5:30
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुरक्षितेची जबाबदारी अवघ्या तीन सुरक्षारक्षकारक्षकांवर असल्याची बाब येथील नुकत्याच शिकाऊ डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर समोर आली
पंकज रोडेकर,
ठाणे- गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुरक्षितेची जबाबदारी अवघ्या तीन सुरक्षारक्षकारक्षकांवर असल्याची बाब येथील नुकत्याच शिकाऊ डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर समोर आली आहे.
त्यामुळे येथील डॉक्टर, रुग्ण आणि एकंदरीत सर्व गोष्टींच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रुग्णालयाला सुरक्षितेसाठी तब्बल ५० सुरक्षारक्षकांची गरज असून त्यादृष्टीने वारंवार आरोग्य विभागाकडे मागणी केल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र ती अद्याप पूर्ण झालेली नाही.
या रुग्णालयात जिल्ह्यातील ग्रामीण भागातून गोरगरिब रु ग्ण उपचार घेण्यासाठी येतात. त्यातच या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसह डॉक्टरांच्या सुरक्षितेसाठी सुरुवातीपासून चार सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, सध्याच्या घडीला त्यापैकी तीन सुरक्षारक्षकांवर रुग्णालयाच्या सुरक्षितेची जबाबदारी आहे. त्यांच्यावर रुग्णालयातील लेबर वार्ड, नवजात शीशु कक्ष आणि ट्रामा केअर वार्ड आणि अपघात कक्ष या ठिकाणांची जबाबदारी असते. त्यादृष्टीने ही संख्या फार कमी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
त्यातच धुळे, मुंबईतील डॉक्टरांवर झालेल्या हल्लयानंतर त्यांनी पुकारलेल्या संपामुळे ठाणे रुग्णालयात ठाणे शहर पोलिसांनी आठ (दिवस-रात्र प्रत्येकी चार) पोलीस तैनात केले होते. याचदरम्यान, जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ आलेल्या रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी शिकाऊ डॉक्टरवर हल्ला केला. त्यानंतर येथील सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ लागला. या हल्लयानंतर रुग्णालयाती सुरक्षितेच्या दृष्टीने शहर पोलिसांनी आणखी चार पोलीस वाढवून दिल्याने रुग्णालयात हत्यारी १२ पोलीस तैनात आहेत. तर दुसरीकडे रुग्णालयाने प्रशासनाने खाजगी सुरक्षारक्षक मिळावेत अशी मागणी पुन्हा आरोग्य विभागाक डे केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र या मागणीला अजून आरोग्य विभागाने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे वाढीव सुरक्षारक्षकांची मागणी पूर्ण झालेली नाही. (प्रतिनिधी)
>रुग्णालयाच्या सुरक्षिततेसाठी सध्या तीन सुरक्षारक्षक आणि १२ पोलीस आहेत. रूग्णालयातील कर्मचाऱ्यांवर रूग्णांच्या नातलगांकडून होणारे वाढते हल्ले लक्षात घेवून रुग्णालयात आणखी ५० सुरक्षारक्षकांची गरज आहे. त्यानुसार आरोग्य विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. - डॉ. केम्पी पाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
जिल्हा सामान्य रु ग्णालय.