कोरोनाच्या काळात अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स, नीलम गोऱ्हेंच्या बैठकीला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 09:48 AM2021-05-12T09:48:32+5:302021-05-12T09:50:13+5:30

Neelam Gorhe : कोविड -19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

District level task force for orphaned children during Corona, Neelam Gorhe meeting a success | कोरोनाच्या काळात अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स, नीलम गोऱ्हेंच्या बैठकीला यश

कोरोनाच्या काळात अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स, नीलम गोऱ्हेंच्या बैठकीला यश

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील दहा सदस्यीय समितीमधील प्रत्येक अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्यामुळे राज्यातील बालकांच्या जीवित व वित्ताचे संरक्षण व संवर्धन होणार आहे.

मुंबई : कोरोना (कोविड -19) साथ रोगाने बाधित बालके, तसेच साथ रोगात आई वडील गमावलेल्या बालकांचे संरक्षण व प्रतिपालन करण्याबाबत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दि. ०६ मे, २०२१ रोजी महिला व बाल विकास विभागाचे व इतर संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली होती. दरम्यान, यासंदर्भात कोविड -19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय महिला व बाल  विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे. या निर्णयाबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे अभिनंदन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील दहा सदस्यीय समितीमधील प्रत्येक अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्यामुळे राज्यातील बालकांच्या जीवित व वित्ताचे संरक्षण व संवर्धन होणार आहे. चाइल्ड हेल्पलाईन 1098 प्रभावी वापर करून सर्व अनाथ झालेल्या बालकांचे संगोपन व सौरभ संरक्षण होणार आहे. राज्य शासनाच्या या उत्कृष्ट निर्णयाबद्दल डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. तसेच सर्व जिल्हाधिकारी या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करतील अशी आशा व्यक्त केली आहे.

सद्यस्थितीत कोरोनाचा विषाणूचा वाढलेला संसर्ग आणि त्यामुळे कोविड-19 बाधीत व्यक्तींचे व मृत्यूचे वाढलेले प्रमाण विचारात घेता, त्याचा बालकांच्या जीवनावर देखील गंभीर परिणाम होत आहे. काही प्रसंगी कोविड-19 या रोगामुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त आहे. 

टास्क फोर्स गठित करण्याचे निर्देश
सर्वोच्च न्यायालय येथील न्यायाधीशांच्या बाल न्याय समितीमार्फत (जे जे कमिटी) कोविड-19 या रोगाच्या अनुषंगाने राज्यातील बालकांची काळजी व संरक्षणासंबधी कार्य करणाऱ्या संस्थांबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित मुद्यांच्या अनुषंगाने व इतर मुद्यांबाबत जिल्हा स्तरावर टास्क फोर्स गठित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे समन्वयक म्हणून काम पाहतील
या निदेर्शानुसार जिल्हास्तरावर टास्क फोर्स गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या टास्क फोर्समध्ये संबंधित जिल्ह्याच्या क्षेत्रातील महानगरपालिकांचे आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य म्हणून तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे समन्वयक म्हणून काम पाहतील. तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे या टास्क फोर्सचे सदस्य सचिव आहेत.

जिल्हाधिकारी टास्क फोर्सच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतील
यामध्ये जिल्हाधिकारी हे टास्क फोर्सच्या कामकाजावर संपूर्ण नियंत्रण ठेवतील. तसेच संपूर्ण जिल्ह्यात कोविड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांबाबतची तपशिलवार माहिती समन्वयकांना उपलब्ध करुन देण्याबाबत संबधितांस निर्देश देणे; दर पंधरा दिवसातून एकदा टास्क फोर्सची बैठक आयोजित करून कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील बालगृहे/निरिक्षण गृहांतील मधील प्रवेशित व तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा तसेच टास्क फोर्सच्या कामकाजाचा आढावा घेतील.

उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक
महानगरपालिकेचे आयुक्त हे महानगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांबाबतची तपशीलवार माहिती समन्वय अधिकाऱ्यास उपलब्ध करून देण्याबाबत त्यांच्या नियंत्रणाखालील संबधित अधिकाऱ्यास निर्देश देतील. तसेच महानगरपालिकांचे आयुक्त महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात आणि जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात रुग्ण कोविड-19 वरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होतेवेळी या कालावधीमध्ये आपल्या बालकाचा ताबा कोणाकडे द्यावा ही माहिती रूग्णाकडून भरून घेण्याबाबत कार्यक्षेत्रातील सर्व रूग्णालयांना निर्देश देतील. तसेच चाईल्ड हेल्प लाईन क्र. 1098 चा माहिती फलक कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात येईल याची दक्षता घेतील. याशिवाय कोरोनाच्या पाश्वभूमीवर कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या बालगृहे/ निरीक्षणगृहांकरीता तात्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करतील.

चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर कारवाई 
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वोतोपरी संरक्षण उपलब्ध करून देणे व अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार अथवा तस्करी सारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाहीत याची दक्षता घेणे; अशा बालकांच्या दत्तक विधानाबाबत समाजमाध्यमांमध्ये चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम पोलीस आयुक्त/ अधिक्षक (ग्रामीण) यांच्याकडून केले जाईल.
 

Web Title: District level task force for orphaned children during Corona, Neelam Gorhe meeting a success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.