जि. प. सदस्यांची अंगझडती - दीड लाखांची अपसंपदा सापडली
By admin | Published: October 5, 2014 01:13 AM2014-10-05T01:13:33+5:302014-10-05T01:13:33+5:30
येथील जिल्हा परिषद सभापतिपदाच्या निवडणुकीदरम्यान सदस्यांची पोलिसांनी अंगझडती घेण्याचा अभूतपूर्व प्रकार घडला. सदस्यांजवळून तब्बल १ लाख ४९ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले.
भाजपा सदस्यांचा समावेश : सभापतिपदाच्या निवडणुकीदरम्यान घडला प्रकार
चंद्रपूर : येथील जिल्हा परिषद सभापतिपदाच्या निवडणुकीदरम्यान सदस्यांची पोलिसांनी अंगझडती घेण्याचा अभूतपूर्व प्रकार घडला. सदस्यांजवळून तब्बल १ लाख ४९ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. या प्रकारामुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली.
विशेष म्हणजे, अध्यक्षासह नवनियुक्त सभापती आणि सदस्यांची पोलिसांनी अंगझडती घेत त्यांना तब्बल पाच तासपर्यंत अडवून ठेवले. भाजपाच्या अलका आत्राम महिला सदस्याजवळ एक लाख रुपये आढळून आल्याने वर्तवितर्क व्यक्त केले जात आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत सदस्यांची चौकशी सुरु होती. जिल्हा परिषद सभापतींची निवडणूक शनिवारी होती. या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच सदस्यांजवळ मोठ्या रक्कम असल्याचा निनावी फोन पोलिसांना आला.
ही माहिती मिळताच रामनगर पोलिसांच्या पथकासह निवडणूक निगरानी पथकाच्या सदस्यांनी जिल्हा परिषद गाठली. सभागृहात बसलेल्या सर्व सदस्यांना बाहेर बोलावून सर्वांची अंगझडती घेण्यात आली. यात जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्यासद नवनियुक्त सभापती आणि सदस्यांचा समावेश होता. यामध्ये भाजपाच्या पाच महिला सदस्यांजवळ रक्कम आढळून आली. यातील अलका आत्राम यांच्याजवळ एक लाख रुपये, वैशाली कुकडे यांच्याजवळ २२ हजार, वर्षा सुरपाम ५ हजार, नीता पेंदाम १७ हजार रुपये आढळून आले. जप्त करण्यात आलेली १ लाख ४९ हजार रुपयांची रक्कम जिल्हा परिषद सदस्यांजवळ कोणत्या मार्गाने आली, याबाबत रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. या प्रकरणात कोणती कारवाई करायची याबद्दल पोलीस पथक आणि निवडणूक विशेष निगराणी पथक संभ्रमात होते. पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडून मत मागविले जात असल्याने बराच वेळ सदस्यांना अडवून ठेवण्यात आले होते.
दरम्यान, पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी अडवून ठेवल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष गुरुनुले आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. काही सदस्यांनी जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही पोलिसांनी जिल्हा परिषद कक्षामध्ये आणले. पोलिसांनी जप्त केलेली रक्कम निवडणूक निगरानी पथकाकडे सुपूर्द केली.
रात्री ८.३० वाजतानंतर नवनियुक्त सभापती देवराव भोंगळे यांनी मध्यस्थी केल्यानंतर बोलावू तेव्हा चौकशीसाठी हजर राहण्याच्या अटीवर सर्वांना जाण्यास परवानगी देण्यात आली. (नगर प्रतिनिधी)