काँग्रेस नेत्यांवर जिल्ह्यांची जबाबदारी

By admin | Published: March 11, 2016 04:12 AM2016-03-11T04:12:33+5:302016-03-11T04:12:33+5:30

राष्ट्रवादीशी थेट पंगा घेणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, यांनी आपली राजकीय मुत्सदेगिरी दाखवून दिली आहे

District responsibility on Congress leaders | काँग्रेस नेत्यांवर जिल्ह्यांची जबाबदारी

काँग्रेस नेत्यांवर जिल्ह्यांची जबाबदारी

Next

मुंबई : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वर्चस्व संपविण्याची जबाबदारी राष्ट्रवादीशी थेट पंगा घेणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, यांनी आपली राजकीय मुत्सदेगिरी दाखवून दिली आहे. पुण्यासह त्यांच्याकडे साताऱ्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे, तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग आणि ठाणे हे दोन जिल्हे सोपवून शिवसेनेशी खुले दोन हात करण्यास मोकळे सोडले आहे.
त्या-त्या जिल्ह्यातील राजकीय गणिते सांभाळून खा.चव्हाण यांनी प्रत्येकाला जबाबदारी तर दिली आहे, शिवाय महत्त्वाचे नेते जिल्ह्यामध्ये कसे मग्न राहतील, याचीही खबरदारी घेतली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वैमनस्य जगजाहीर आहे. त्या पार्श्वभूमीवर वाद होणार नाहीत, पण पक्षाचे कामही अडणार नाही, याची काळजी घेत विखेंना उत्तर अहमदनगर, नाशिक आणि अमरावती हे तीन जिल्हे देण्यात आले असून, थोरातांना दक्षिण अहमदनगर आणि उस्मानाबादची जबाबदारी दिली गेली आहे.
औरंगाबादचे पालकमंत्री राहिलेले विखे, थोरात यांना वगळून या जिल्ह्याची धुरा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर सोपवली आहे. खा. राजीव सातव यांना हिंगोलीची, तर लातूर, बीड या दोन जिल्ह्यांची जबाबदारी आ. अमित देशमुख यांच्याकडे दिली आहे.
नेहमी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणाऱ्या पतंगराव कदम यांना सांगली जिल्ह्यापुरते मर्यादित केले आहे, तर डी.पी. सावंत यांना नांदेड आणि परभणीची जबाबदारी देण्यात आली आहे. पालघर रोहिदास पाटील यांच्याकडे तर गडचिरोली व नागपूरची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आली आहे. भंडारा, गोंदियाचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. काही जिल्ह्यांच्या बाबतीत अद्याप निर्णय व्हायचे आहेत, शिवाय जिल्हाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली असून, येत्या आठ ते दहा दिवसांत तीही संपेल, असे खा. चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ज्यांंचा कार्यकाळ संपून बराच काळ लोटला आहे, त्यांना आधी बदलले जाईल, असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: District responsibility on Congress leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.