शिक्षकांच्या रिक्तपदांमुळे पालकांनी उन्हात भरविली जि.प.ची शाळा
By admin | Published: January 2, 2017 06:33 PM2017-01-02T18:33:43+5:302017-01-02T18:49:06+5:30
चार वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक असल्याचे पाहून संतप्त झालेल्या धनेगाव (ता. देवणी) येथील नागरिकांनी सोमवारी चार तास शाळा बंद केली
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 2 - चार वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक असल्याचे पाहून संतप्त झालेल्या धनेगाव (ता. देवणी) येथील नागरिकांनी सोमवारी चार तास शाळा बंद केली आणि त्यांनीच व्हरांड्यातच शाळा भरविली. दरम्यान, प्रखर उन्हामुळे दोन विद्यार्थ्यांना भोवळ आली़ सुदैवाने कुठलीही दुर्दैवी घटना घडली नाही.
देवणी तालुक्यातील धनेगाव येथे जिल्हा परिषदेची शाळा असून, इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेत १०७ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांसाठी चार शिक्षकांची पदे असली तरी त्यातील दोन पदे रिक्त असून एका शिक्षकाची बदली आहे. चार वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक आहेत.
नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी शाळा भरली होती. दरम्यान, शिक्षक कमी असल्याने आमच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे म्हणत सरपंच त्र्यंबकराव सूर्यवंशी, सोनू डगवाले, पुंडलिक बिरादार, रामलिंग शेरे, ज्ञानोबा बिरादार आदी गावकऱ्यांनी शाळेत येऊन विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले. या विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसवून त्यांनीच शाळा भरविली. कडक उन्हामुळे शाळेतील दोन विद्यार्थ्यांना भोवळ आली. दरम्यान, दुपारी शिक्षण विस्तार अधिकारी संतोष स्वामी यांनी भेट देऊन उद्यापासून अन्य एक शिक्षक उपलब्ध करुन दिले जाईल, असे सांगितले. त्यामुळे गावकऱ्यांनी माघार घेतली.