पालघरला बदलीमुळे जि.प. कर्मचारी अस्वस्थ

By admin | Published: June 11, 2016 03:35 AM2016-06-11T03:35:11+5:302016-06-11T03:35:11+5:30

पालघर जिल्ह्यातील रिक्त जागी ठाणे जिल्हा परिषदेच्या ४७९ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघणे जवळजवळ निश्चित झाले

District shift due to Palghar Emergency | पालघरला बदलीमुळे जि.प. कर्मचारी अस्वस्थ

पालघरला बदलीमुळे जि.प. कर्मचारी अस्वस्थ

Next


ठाणे : पालघर जिल्ह्यातील रिक्त जागी ठाणे जिल्हा परिषदेच्या ४७९ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघणे जवळजवळ निश्चित झाले आहेत. आदिवासी, दुर्गम भागात होऊ घातलेल्या बदल्यांमुळे कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. आचारसंहिता संपल्यामुळे सोमवारपासून या कर्मचाऱ्यांना बदल्यांचे आदेश देण्यास प्रारंभ होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
नोकरभरतीनंतरपालघर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुन्हा ठाणे जिल्ह्यात होणार आहेत. तेथे प्राधान्याने या कर्मचाऱ्यांना संधी मिळणार आहे. तसा अध्यादेशही राज्य शासनाने काढला आहे. पण, बदल्यांमध्ये सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्यामुळे त्या रद्द करण्याची मागणी कर्मचारी संघटना करीत आहेत. मात्र, या विरोधालाही विलंब झाल्यामुळे केवळ कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न संघटना करीत असल्याचे एका महिला कर्मचाऱ्याने सांगितले.
या बदल्यांच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांकडून लेखणीबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला होता. पण, बदल्या होणारच आहेत, हे लक्षात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडल्यामुळे हे आंदोलन बारगळले आहे. बदल्यांमध्ये सुमारे २०० पेक्षा अधिक महिलांचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर पालघर जिल्हा अस्तित्वात आला. मात्र, नव्या पालघर जिल्ह्याच्या रिक्त पदांवर अद्यापही भरती करण्यात आलेली नाही.
राज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये अध्यादेश काढून दोन्ही जिल्ह्यांत समान पदे रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील बिंदू नामावलीनुसार ठाणे जिल्ह्यातील ४७९ कर्मचाऱ्यांच्या पालघरमध्ये बदल्या झाल्या आहेत. त्यातील बहुसंख्य कर्मचारी कल्याण ते बदलापूर पट्ट्यातील रहिवासी आहेत. (प्रतिनिधी)
सेवानिवृत्तीचा विचार?
या बदल्यांमधून वयस्कर, पती-पत्नी एकत्रीकरण, दुर्धर आजार, अपंग या मुद्द्यांचा विचार करून काही व्यक्तींना वगळण्यात आले. मात्र परित्यक्ता, विधवा, माजी सैनिकांचाही या बदल्यांमध्ये समावेश असल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे.
दररोजच्या किमान पाच ते सहा तासांच्या प्रवासाला कंटाळून अनेक कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याच्या प्रयत्नात आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. तर, काहींनी तसे प्रस्तावही तयार केले आहेत. मात्र, त्यास दुजोरा मिळू शकलेला नाही.

Web Title: District shift due to Palghar Emergency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.