जिल्ह्यात टोल बसवू देणार नाही

By Admin | Published: June 25, 2015 11:28 PM2015-06-25T23:28:20+5:302015-06-25T23:28:20+5:30

नारायण राणे : कणकवली येथे मच्छिमार्केटचा प्रारंभ

The district will not allow toll to be installed | जिल्ह्यात टोल बसवू देणार नाही

जिल्ह्यात टोल बसवू देणार नाही

googlenewsNext

कणकवली : कणकवली शहर राज्यात नावारूपाला येण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. येथे अद्ययावत मच्छीमार्केट उभारून लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली आहे. यापुढेही क्रीडांगण, उद्यान असे समाजोपयोगी प्रकल्प उभारले जातील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर कोणत्याही परिस्थितीत शासनाला टोल लावू देणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले.येथील नगरपंचायतीच्यावतीने पटकीदेवी मंदिराशेजारी अद्ययावत मच्छीमार्केट उभारण्यात आले आहे. या मच्छीमार्केटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, उपनगराध्यक्ष समीर नलावडे, ज्येष्ठ व्यापारी सुरेश कामत, विजयकुमार वळंजू, भाई खोत, प्रांताधिकारी संतोष भिसे, तहसीलदार समीर घारे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.नारायण राणे म्हणाले, नागरिकांना १८ नागरी सुविधा देण्यासाठी नगरपंचायत आहे, याचे भान नगरसेवकांनी ठेवणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पहिले सुसज्ज मच्छीमार्केट येथे उभारण्यात आले असून स्वच्छतेबरोबरच त्याची चांगली निगा राखणे हे सर्वांचे काम आहे. भेसळयुक्त भाज्या, फळे नागरिकांपर्यंत जाऊ नयेत यासाठी नगरपंचायतीने प्रयत्न करावेत. नागरिकांनी नगरसेवकांवर अंकुश ठेवण्याबरोबरच त्यांना सहकार्यही केले पाहिजे. शहरातील नागरिक निरोगी राहतील यादृष्टीने नगरपंचायतीने प्रयत्न करावेत. शहराची गरज असलेले क्रीडांगण तसेच उद्यानाचे भूमिपूजन लवकरच करण्यात येईल असेही ते म्हणाले.नीतेश राणे म्हणाले, जिल्ह्यातील राजकारण सध्या ज्या दिशेने जात आहे ते पाहता नारायण राणे यांच्यासारखे राजकीय इच्छाशक्ती असलेलेच नेते येथे असणे आवश्यक आहे. सध्या जिल्ह्याच्या विकासाचा प्रवास अंधाराच्या दिशेने चालला आहे. नारायण राणे पालकमंत्री असताना विकासाला त्यांनी दिशा दिली होती. मात्र, आता त्या विरूद्ध परिस्थिती आहे. सध्याचे पालकमंत्री पालक नसून मालक बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिल्हा नियोजन समितीसाठी निधी, महामार्ग चौपदरीकरण, आंबा बागायतदार तसेच मच्छीमारांचे प्रश्न यासाठी आम्हाला भांडावे लागत आहे. शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. यावर सत्ताधारी कोणतीही उपाययोजना करीत नाहीत. टीका करणे सोपे असते. मात्र, विकास करण्यासाठी दूरदृष्टी लागते. कणकवली हे आदर्श शहर बनविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शहर विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी लवकरच खासगी सल्लागार नियुक्त करण्यात येईल. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करूनच पुढील निवडणुकीत आम्ही मते मागायला येऊ.
नीलेश राणे म्हणाले, कणकवली शहरातील ५८ आरक्षणे विकसित केली तरी शहरातील अनेक समस्या सुटणार आहेत. हे शहर माझं आहे या भावनेतून नागरिक तसेच नगरसेवकांनी विकासासाठी प्रयत्न करावेत. चौफेर विकास होणे आवश्यक असून त्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. राणे कुटुंबीय महाराष्ट्रात मानानेच राहिले असून मानानेच मरणार आहे. त्यामुळे विरोधकांनी टीका करताना याचा विचार करावा.
संदेश पारकर, भाई खोत, सुरेश कामत, जगन्नाथ सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी केले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी तर आभार मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी मानले. सावंतवाडी येथील मृगेश पालव या विद्यार्थ्याने आपले मत यावेळी मांडले. (वार्ताहर)

पालकमंत्री आहे हे का सांगावे लागते?
लोकप्रतिनिधींनी निधी उपलब्ध करून दिला तरच विकास होतो. हे मच्छीमार्केट तत्कालीन खासदार नीलेश राणे यांच्यामुळेच होऊ शकले आहे. आताचे पालकमंत्री फक्त श्रेय घेण्यासाठीच असून त्यांचा कोणताही अभ्यास नाही. त्यांना मी पालकमंत्री आहे असे वारंवार का सांगावे लागते? गेल्या पंचवीस वर्षांत आम्ही जे काम केले त्याच्या एक टक्का तरी त्यांनी केले का? याचा प्रथम विचार करावा आणि त्यानंतरच टीका करावी. मेडिकल कॉलेज, इंजिनिअरींग कॉलेज, विमानतळ असे जनतेच्या हिताचे प्रकल्प आम्ही आणले आहेत. शिवसेना-भाजपावाल्यानी असे एक तरी विधायक काम करून दाखवावे त्यानंतरच टीका करावी. गेले काही दिवस मी शांत होतो. मात्र, आता जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही राणे यांनी यावेळी सांगितले.


जमीन मालकांचा सत्कार
मच्छिमार्केटसाठी जमीन देणाऱ्या खेमाजी राणे, जगन्नाथ सावंत तसेच वास्तूरचनाकार देशपांडे, पांगम, ठेकेदार रामदास विखाळे, रघु नाईक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Web Title: The district will not allow toll to be installed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.