जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीच्या आकड्यांमध्ये गोंधळ
By admin | Published: July 10, 2017 03:16 AM2017-07-10T03:16:44+5:302017-07-10T03:16:44+5:30
रायगड जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होईल, असे टि्वट मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते
आविष्कार देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होईल, असे टिष्ट्वट मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते, तर पालकमंत्र्यांनी हाच आकडा सात हजार असल्याचे सांगितले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह सहकार विभागानेही अद्याप अधिकृत आकडा जाहीर न केल्यामुळे रायगड जिल्ह्यातील नेमक्या किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार? या आकडेवारीमध्ये गोंधळ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारने लावलेल्या विविध निकषानंतर शेतकऱ्यांचा आणि कर्जाच्या रकमेचा आकडा हा खूपच कमी राहण्याची शक्यता मात्र सहकार विभागाने व्यक्त केली आहे.
रायगड जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती रकमेची कर्जमाफी मिळणार आहे. याबाबतचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व स्तरातील आकडेवारी हातात येण्यासाठी अजून चार-पाच दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे आताच ठोस सांगता येणार नाही, असे सहायक उपनिबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. जिल्ह्यामध्ये सात हजार ९३० शेतकरी कर्जदारांची संख्या असल्याचे रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जाहीर केले होते. त्यामध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंर्तगत येणाऱ्या १२६ विविध विकाससंस्थांचे एक हजार ७८९ थकबाकीदार आहेत. त्यांच्या थकबाकीची रक्कम सुमारे नऊ कोटी ७३ लाख ४१ रुपये होते. अलिबाग तालुक्यातील अन्य चार विकाससंस्थांचे ३० थकबाकीदार आहेत. त्यांच्या थकबाकीची रक्कम ही चार लाख सात हजार रुपये आहे.
जिल्हा अग्रणी बँकेअंर्तगत येणाऱ्या बँकांमधील सहा हजार ११० कर्जदार आहेत. त्यांच्या कर्जाचा आकडा हा ३९ कोटी १६ लाख रुपये आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एकानेच ५६ हजार रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. त्यांच्या सर्वांच्या कर्जाची रक्कम सुमारे ४८ कोटी ८९ लाख ९७ हजार रुपयांच्या घरात जाते. कर्जमाफीसाठी राज्य सरकारने विविध निकष लागू केले आहेत. त्यामुळे अल्प कर्जदारांनाच त्याचा थेट फायदा होण्याची शक्यता असल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सात हजार ९३० शेतकऱ्यांचा आकडा हा निश्चितच खाली येणार असल्याचे स्पष्ट होते. आरडीसीसी बँकेचा शून्य एनपीए आहे. त्यांचे कर्ज बुडण्याचे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्हा हा कमी कर्जमाफीचा लाभ घेणारा जिल्हा ठरणार असल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले.