पावसाळ्यात रस्ता खोदाई
By Admin | Published: July 22, 2016 12:47 AM2016-07-22T00:47:50+5:302016-07-22T00:49:17+5:30
इंगळेनगर वसाहतीत जाणारा रस्ता भर पावसाळ्यात ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी खोदल्याने नागरिकांची अडचण होत आहे.
वारजे : वारजे जकात नाका भागातील इंगळेनगर वसाहतीत जाणारा रस्ता भर पावसाळ्यात ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी खोदल्याने नागरिकांची अडचण होत आहे. या रस्त्यावर मुरूम व चिखलाचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालकांसह पादचाऱ्यांना याचा त्रास होत
आहे.
जकातनाका परिसरात इंगळेनगर कॉलनी आहे. येथे मुख्य कमानीतून आत आल्यावर अजून एक कमान आहे. येथेच इंद्रायणी कॉलनीला लागूनच पालिकेतर्फे खोदकाम चालू आहे. पावसाळ्यात चालू असलेल्या या धिम्या गतीच्या खोदाईमुळे नागरिकांना त्रास होत आहे.
रस्ता मुळातच अरुंद असल्याने या रस्त्यावर चारचाकी वाहने नेण्यास अडचण होत असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. शिवाय, यांच्या ब्रेकर मशीनमुळे आवाजाचा त्रासदेखील होत आहे. याकडे महापालिका लक्ष देत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.
याबाबत स्थानिक मजूर व पर्यवेक्षकांना विचारणा केल्यावर काम करताना खाली कठीण खडक लागला आहे. त्यामुळे ब्रेकरने तोडायला उशीर होत आहे व कामचा वेगही मंदावला असल्याचे त्यांनी सांगितले.(वार्ताहर)
>सुटीच्या दिवशीही काम
येथील नागरिक लालचंद दांगट म्हणाले की, मागील ८ दिवसांपासून काम चालू असून, आतापर्यंत साधारण २० फूटच खोदाई झाली आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन पालिकेने सुट्टीच्या दिवसातपण काम करणे अपेक्षित असताना सुट्टीच्या दिवशी खुशाल काम बंद ठेवण्यात येते. याबाबत काम करणाऱ्या मजुरांना विचारणा केल्यावर ते प्रतिसादही देत नाहीत. तातडीच्या कामासाठी अधिकचे मनुष्यबळ व यंत्रासामग्री वापरून काम लवकर पूर्ण करायला हवे.