दिवा-रोहा दुपदरीकरण अखेर पूर्ण!
By Admin | Published: April 12, 2017 02:28 AM2017-04-12T02:28:13+5:302017-04-12T02:28:13+5:30
कोकणात जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेसबरोबरच पॅसेंजर ट्रेनला मध्य रेल्वेच्या दिवा-रोहा हद्दीतून जावे लागते. मात्र, उपलब्ध असलेला एकेरी मार्ग आणि त्यामुळे दिवा ते रोहा अंतर पार करण्यास
मुंबई : कोकणात जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेसबरोबरच पॅसेंजर ट्रेनला मध्य रेल्वेच्या दिवा-रोहा हद्दीतून जावे लागते. मात्र, उपलब्ध असलेला एकेरी मार्ग आणि त्यामुळे दिवा ते रोहा अंतर पार करण्यास लागणारा वेळ पाहता, या मार्गाचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने काही वर्षापूर्वी घेतला. हे काम नुकतेच पूर्ण झाले असून, त्यामुळे एक्स्प्रेससह पॅसेंजर ट्रेनच्या वेळेत चांगलीच बचत होत आहे, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
कोकण रेल्वेकडून रोहा ते ठोकुरपर्यंतचे दुहेरीकरण केले जाणार आहे. दुहेरीकरण केल्यामुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा मार्ग सुकर होईल. सध्या एकच मार्ग उपलब्ध असल्याने एखादा अपघात झाल्यास संपूर्ण सेवा कोलमडते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ही समस्या लक्षात घेता, या मार्गांवर ११ हजार कोटी रुपये खर्च करून दुहेरीकरण केले जात आहे. मात्र, त्या आधी मध्य रेल्वेकडून त्यांच्या हद्दीतील दुहेरीकरणाचे काम मार्गी लावले जात आहे. पनवेल ते रोहा असे १११ किलोमीटर दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्यावर मध्य रेल्वेकडून भर देण्यात आला. यात पनवेल ते पेणसाठी २७० कोटी रुपये, तर पेण ते रोहासाठी ३७० कोटींची तरतूद रेल्वेकडून करण्यात आली. यातील प्रथम पनवेल ते पेणपर्यंतचे काम पूर्ण केले. त्यानंतर, पेण ते रोहा टप्प्यातील सर्व कामे पूर्ण करून नागोठणे ते रोहा या अवघ्या १३ किलोमीटरचे काम बाकी होते.
काम डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते. परंतु, या मार्गातील जागेवरून वाद होता. त्यावर तोडगा काढल्यानंतर, मार्चमध्ये काम पूर्ण झाले असून एप्रिलपासून दुहेरी मार्ग सेवेत आला. (प्रतिनिधी)
1सध्या एक्स्प्रेस ट्रेनला दिवा ते रोहापर्यंत जाण्यासाठी साधारपणे दोन तास तर पॅसेंजर गाड्यांना किमान तीन तास लागतात. दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने, त्यांच्या वेळेत बचत होण्यास सुरुवात झाली आहे.
2दुहेरीकरणामुळे दिघी बंदरावरील भार कमी होतानाच, न्हावा शेवा बंदराकडेही मालाची ने-आण करताना लागणारा वेळ कमी होत आहे.