दिवेआगर सुवर्ण गणेश दरोडा व दुहेरी खून खटला, 12 पैकी 10 आरोपी दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 06:00 PM2017-10-13T18:00:17+5:302017-10-13T18:00:57+5:30
दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर दरोडा व दोन खूनप्रकरणी जिल्हा न्यायालयातील मोक्का न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यावर, या राज्यभर गाजलेल्या प्रकरणातील 12 पैकी 10 आरोपींना विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधीश किशोर पेठकर यांनी शुक्रवारी दुपारी झालेल्या सुनावणीत दोषी धरलं
जयंत धुळप
अलिबाग- दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर दरोडा व दोन खूनप्रकरणी जिल्हा न्यायालयातील मोक्का न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यावर, या राज्यभर गाजलेल्या प्रकरणातील 12 पैकी 10 आरोपींना विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधीश किशोर पेठकर यांनी शुक्रवारी दुपारी झालेल्या सुनावणीत दोषी धरलं असून, सोमवार 16 ऑक्टोबर रोजी अंतिम निकाल देण्यात येणार आहे. दरम्यान महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) मधून या सर्व आरोपींची मुक्तता केली आहे.
दरम्यान उर्वरित कलमांन्वये न्यायालयाने दोषी ठरवलेल्या 12 पैकी 10 आरोपींमध्ये नवनाथ विक्रम भोसले (32, रा.घोसपुरी,अहमदनगर), कैलास विक्रम भोसले (29, रा.घोसपुरी, अहमदनगर), छोट्या उर्फ सतीश जैनु काळे (25, बिलोणी,औरंगाबाद), आनंद अनिल रायमोकर (38, बेलंवडी, श्रीगोंदा, अहमदनगर), अजित अरुण डहाळे (28, श्रीगोंदा, अहमदनगर), विजय ऊर्फ विज्या बिज्या काळे (28, श्रीगोंदा, अहमदनगर), ज्ञानेश्वर विक्रम भोसले (34, घोसपुरी, अहमदनगर), खैराबाई विक्रम भोसले (56, घोसपुरी, अहमदनगर), कविता ऊर्फ कणी राजू काळे (44, हिरडगाव, श्रीगोंदा, अहमदनगर) आणि सुलभा शांताराम पवार (56, श्रीगोंदा, अहमदनगर) यांचा समावेश असल्याची माहिती सरकार पक्षाकडून या खटल्याचे न्यायालयात काम पाहणारे रायगड जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील यांनी दिली आहे.
न्यायालयाने दोषमुक्त केलेल्या दोघांमध्ये गणोश विक्रम भोसले (26, घोसपुरी, अहमदनगर) आणि विक्रम हरिभाऊ भोसले (66, घोसपुरी, अहमदनगर) यांचा समावेश असल्याचे अॅड. पाटील यांनी अखेरीस सांगितले.