विश्वस्त पदावरुन दिवेकर यांना हटविले
By admin | Published: February 12, 2017 01:52 AM2017-02-12T01:52:47+5:302017-02-12T01:52:47+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या महाकोषनिधीच्या विश्वस्तांना कोणतीही पूर्वकल्पना न देता या पदावर राजन मुठाणे याची निवड करण्यात आली आहे.
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या महाकोषनिधीच्या विश्वस्तांना कोणतीही पूर्वकल्पना न देता या पदावर राजन मुठाणे याची निवड करण्यात आली आहे. विश्वस्त डॉ. कल्याणी दिवेकर यांच्याकडे राजीनाम्याची मागणी झालेली नाही किंवा त्यांची नेमणूक रद्द केल्याचे पत्र पाठविण्याचे सौजन्यही दाखवण्यात आलेले नाही. दिवेकर या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी सदस्य नसल्याने असा निर्णय घेतल्याचे कारण पुढे आल्याने याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे साहित्य संमेलन, उपक्रम यासाठी महाकोषनिधीची संकल्पना अस्तित्वात आली. महाकोषनिधीच्या समितीवर महामंडळाच्या चार घटकसंस्थांचे प्रत्येकी दोन पदाधिकारी विश्वस्त म्हणून नेमले जातात. याजागी मसापतर्फे डॉ. कल्याणी दिवेकर आणि राजन लाखे यांची नेमणूक करण्यात आली होती. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी होती. मात्र, महामंडळ विदर्भ साहित्य संघाकडे गेल्यावर दिवेकर यांची पाच वर्षांची मुदत पूर्ण न करता अचानक त्यांच्या जागी राजन मुठाणे यांनी निवड करण्यात आली. लाखे हे सध्या साहित्य परिषदेचे पदाधिकारी असून त्यांचे विश्वस्तपद कायम ठेवले.
डॉ. दिवेकर सध्या साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी सदस्य नाहीत. जे सदस्य असतात, त्यांचीच निवड विविध पदांवर करणे हा संकेत आहे. त्यामुळे त्यांचे नाव वगळून मुठाणे यांची निवड करण्याचा निर्णय कार्यकारिणीने घेतला आहे. परंतु जबाबदारीतून मुक्त करत आहोत, असे पत्र दिवेकर यांना पाठवायला हवे होते, अशी प्रतिक्रिया मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी दिली. (प्रतिनिधी)
मी विश्वस्तपदाचा राजीनामा दिलेला नाही, किंवा माझ्याकडे कोणी राजीनामा मागितलेला नाही.
- डॉ. कल्याणी दिवेकर