नाशिक विभागातील महामार्गावरील अपघातांमध्ये घट

By admin | Published: May 27, 2017 08:08 AM2017-05-27T08:08:50+5:302017-05-27T08:10:11+5:30

गेल्या काही वर्षांमध्ये नाशिक परीक्षेत्रातील महामार्गावरील अपघाताचा आलेख चढता होता. मात्र, २०१५ व २०१६ या वर्षातील आकडेवारीचा तौलनिक अभ्यास केला असता अपघातांमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे.

Diversion of accidents on the highway in Nashik Division | नाशिक विभागातील महामार्गावरील अपघातांमध्ये घट

नाशिक विभागातील महामार्गावरील अपघातांमध्ये घट

Next
>ऑनलाइन लोकमत/विजय मोरे
नाशिक, दि. 27 -  वाहनांचा वाढलेला वेग, वाढती संख्या व त्यातच पूर्वी दुहेरी असलेले राज्य व राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणात झालेले रुपांतर यामुळे गत काही वर्षांमध्ये नाशिक परीक्षेत्रातील महामार्गावरील अपघाताचा आलेख चढता होता. मात्र, २०१५ व २०१६ या वर्षातील अपघात व त्यातील मयत व जखमी यांच्या आकडेवारीचा तौलनिक अभ्यास केला असता या अपघातांमध्ये अल्पशी घट झाल्याचे समोर आले आहे. अर्थात ही समाधानाची बाब असली तरी यामध्ये आणखी सुधारणा कशी घडवून आणला येईल याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.
 
नाशिक परिक्षेत्रातील चार जिल्ह्यातील घोटी, पिंपळगाव, मालेगाव, धुळे, शिरपूर, पाळधी, चाळीसगाव, विसरवाडी व सिन्नर येथून राष्ट्रीय व राज्य महामार्ग आहे़ या चार जिल्ह्यांमधील महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये दरवर्षी सरासरी १५० नागरिक मृत्युमुखी पडतात़ तर यावर्षीचा जानेवारी ते मार्च २०१७ या तीन महिन्यांच्या कालावधीत १५३ अपघातात झाले असून त्यामध्ये ६० लोकांचा मृत्यू झाला आहे़ राज्यात दरवर्षी होणाऱ्या महामार्गावरील अपघातांमध्ये १२ हजार नागरिकांचा मृत्यू होतो़.
 
अतिवेगवान वाहने, लेन कटींग, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, रॅश ड्रायव्हिंग, महामार्गालगतच्या गांवाजवळील पंचर वा रोड क्रॉसिंग, रस्त्यात उभी असलेली नादुरुस्त वाहने, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न वापरणे याबरोबरच मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे या कारणांमुळे महामार्गांवरील अपघातांची संख्या वाढते़ तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार महामार्गापासून ५०० मिटरच्या आतील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले असून याचा परिणाम लवकरच बघावयास मिळणार आहे.
 
नाशिक विभागातील नाशिकसह, धुळे, जळगाव, नंदुरबार या चार जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१६ या वर्षात ३२५ अपघात झाले आहेत. यामध्ये १२४ जणांचा मृत्यू झाला असून ५८६ जण गंभीर जखमी झाले आहेत. २०१५ मध्ये ३६३ अपघात झाले आहेत. यामध्ये १३० जणांचा मृत्यू झाला असून ५९९ गंभीर जखमी झाले होते़ २०१५ च्या तुलनेत २०१६ मधील अपघातांमध्येघट दिसत असली तरी चालू वर्षी अवघ्या तीन महिन्यात नाशिक विभागात १५३ अपघात झाले असून यामध्ये ६० जणांचा मृत्यू तर १९९ जण जखमी झाले आहेत.
 
पुणे - नाशिक महामार्गावर अधिक अपघात
नाशिक विभागातून जाणाऱ्या महामार्गावरील अपघातांमध्ये पुणे - नाशिक महामार्ग आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते़ गत वर्षभरात या मार्गावर १०४ अपघातात ३५ जणांचा मृत्यू तर १८२ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर चालू वर्षी २६ अपघातात ९ मृत्युमुखी तर ४९ जण जखमी झाले आहेत़ यानंतर अपघातांमध्ये धुळे व मालेगाव महामार्गाचा समावेश आहे़
 
अपघात रोखण्यासाठी प्रयत्नशील
महामार्गांवरील अपघाताची संख्या कमी करणे व जखमींना तत्काळ मदत करण्यासाठी महामार्ग पोलीस सतत कार्यरत आहे़ अवजड वाहंनाना रिफ्लेक्टर हवेच यासाठी मोहिम सुरू केल्यानंतर सुमारे ९९ टक्के वाहनचालकांनी रिफ्लेक्टर बसवून घेतले आहेत़ याबरोबरच सीटबेल्ट व हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती केली जाते आहे. अतिवेग हे महामार्गावरील अपघातांचे प्रमुख कारण असून ते रोखण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत़ पोलिसांचे प्रयत्न सुरू असले तरी वाहनचालकांनीच स्वत:सह इतरांच्या जीवनाची काळजी घेणे गरजेचे आहे. - सुभाष पवार, प्रभारी उपाधीक्षक, महामार्ग पोलीस
 

Web Title: Diversion of accidents on the highway in Nashik Division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.