राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांची कौतुकास्पद कामगिरी; बारावीचा निकाल ९३.५७ टक्के निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 03:21 PM2020-07-16T15:21:21+5:302020-07-16T15:24:08+5:30
राज्यभरातील जवळपास सहा हजार दिव्यांग विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत दिव्य यश मिळविले आहे..
पुणे : कुणी दृष्टीहीन तर कुणी कर्णबधिर, काहींना मानसिक आजार, बहुविकलांगता, अध्ययन अक्षमता, मज्जातंतुचा आजार.... अशा जवळपास २२ विविध आजारांचा सामना करत असताना खचून न जाता राज्यभरातील जवळपास सहा हजार दिव्यांग विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत दिव्य यश मिळविले आहे. ही परीक्षा दिलेल्या एकुण ६ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ९४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.५७ असून नियमित विद्यार्थ्यांच्या तुलनेत ३ टक्क्यांनी अधिक आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार, दिव्यांग विद्यार्थ्यांची एकुण २२ गटात विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यामध्ये अंशत: किंवा पुर्ण अंध, कर्णबधिर, भाषा व वाचादोष, अस्थिव्यंग, मानसिक आजार, अध्यक्षन अक्षमता, सेरेब्रल पाल्सी, स्वमग्न, बहुविकलांग, कुष्टरोग निवारित, शारीरिक वाढ खुंटणे, बौध्दिक अक्षम, स्नायुची विकृती आदींचा समावेश आहे. त्यानुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. अस्थिव्यंग असलेल्या सर्वाधिक १५८१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १४७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच दृष्टीहीन व अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही एक हजारांहून अधिक होती. मज्जासंस्थेशी संबंधित आजार, वाढ खुंटलेले, भाषा व वाचा दोष, थॅलेसेमिया व अॅसिड हल्ला झालेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या गटातील ९१ विद्यार्थी आहेत.
नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच दिव्यांग विद्यार्थ्यांमधील उत्तीर्णतेत मुलींचीच संख्या अधिक आहे. एकुण ६ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी २ हाजर १३१ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २ हजार २६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.८० असून मुलींची ९५.०७ टक्के एवढी आहे. एकुण २२ पैकी केवळ सिकलसेल गटात मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक होती. यामध्ये ३५ मुले व ४४ मुलींनी परीक्षा दिली होती. एकुण २२ पैकी ९ गटातील सर्व मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
------------------
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल -
विद्यार्थी परीक्षेला बसलेले उत्तीर्ण टक्केवारी
दृष्टीहीन ११५२ १०९९ ९५.४०
कर्णबधिर १०६२ ९५३ ८९.७४
अस्थिव्यंग १५८१ १४७३ ९३.१७
अध्ययन अक्षम १०७७ १०२९ ९५.५४
वाढ खुंटलेले २३ २३ १००
थॅलेसेमिया १४ १४ १००
अॅसिड हल्ला २ २ १००
मज्जातंतुचा आजार ३२ ३२ १००
भाषा व वाचा दोष २१ २१ १००
इतर १३९२ १३०१ ९३.४६
--------------------------------------------------
एकुण ६३५६ ५९४७ ९३.५७