महापालिकेत प्रभाग अनुकूल, आरक्षण प्रतिकूल
By admin | Published: January 7, 2017 02:48 AM2017-01-07T02:48:35+5:302017-01-07T02:48:35+5:30
पनवेल महानगरपालिकेचे आरक्षण आणि प्रारूप गेल्या आठवड्यात जाहीर झाले
कळंबोली : पनवेल महानगरपालिकेचे आरक्षण आणि प्रारूप गेल्या आठवड्यात जाहीर झाले असून, लवकरच निवडणुकीची तारीखही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी भाजपासमोर तिकीट आणि शेकाप आघाडीकरिता जागावाटपासाठी मोठी डोकेदुखी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. इच्छुकांची उमेदवारी मिळवण्यासाठी धावपळ सुरू आहे. तर काही नाराज इच्छुकांकडून पक्षबदलाचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे दोनही प्रमुख पक्षांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
प्रभाग क्र मांक १५मध्ये खांदा वसाहतीचा समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणी भाजपामध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. २७ डिसेंबर रोजी झालेल्या सोडतीत एक जागा ओबीसी पुरुष उमेदवारासाठी राखीव होती. मात्र, निवडणूक आयोगाने त्रुटी काढल्यानंतर २ जानेवारीला पुन्हा सोडत काढण्यात आली. त्यामुळे या प्रभागातील आरक्षण बदलले. या ठिकाणी एक जागा खुल्या प्रवर्गाकरिता राखीव झाली. त्यामुळे शेकापचे तुल्यबळ उमेदवार शिवाजी थोरवे यांचे नशीब उजळले. पनवेल शहर अध्यक्ष विजय काळे हे या ठिकाणी इच्छुक होते. मात्र, अखेर थोरवेंच्या नावाला अनुमोदन मिळाले. भाजपाचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही.
शेकापमधून भाजपामध्ये आलेल्या संजय भोपी यांना उमेदवारी देण्याचे कबूल करण्यात आले होते. इतके दिवस त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र, सलग तीन वेळा नगरसेवक राहिलेले गणेश पाटील यांची पुन्हा रिंगणात उतरण्याची प्रबळ इच्छा आहे. बीड जिल्ह्यातील भाजपाची पार्श्वभूमी असलेला तरुण कार्यकर्ता श्रीहरी मिसाळ यांनी खांदा वसाहतीतून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर ओबीसी महिला असलेल्या जागेवर आपल्या पत्नीला उमेदवारी मिळविण्याकरिता मिसाळ प्रयत्नशील आहेत. भोपी यांचे पारडे जड असल्याने त्यांना संधी मिळू शकते. मात्र, इतरांची समजूत काढण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे.
कळंबोलीत तीन प्रभाग झाले आहेत. येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग तीन, सर्वसाधारण महिला सहा आणि तीन सर्वसाधारण, असे आरक्षण पडले आहे. सर्वसाधारण जागेवर इच्छुकांचा गराडा आहे. या तीनपैकी नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची, हे मोठे आव्हान राजकीय पक्षांसमोर आहे. सर्वात जास्त डोकेदुखी शेकाप-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांना होणार आहे. कामोठे वसाहतीत तर इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. वसाहतीत ११, १२ आणि १४ असे तीन प्रभाग पडले आहेत. एकूण ११ जागेपैकी तीनच जागा सर्वसाधारण आहेत. त्यामध्ये नेमकी कोणा कोणाची वर्णी लावायची? असा प्रश्न नेत्यांसमोर पडला आहे. खारघर वसाहतीत ४ ते ६ क्र मांकाचे प्रभाग निर्माण झाले आहेत. १२ पैकी ५ जागा खुल्या प्रवर्गाकरिता आहेत. सायबर सिटीमध्येही भाजपा व शेकापकडे इच्छुकांची संख्या कमी नाही. त्यामुळे उमेदवारी देताना मोठी कसरत करावी लागणार आहे.
>प्रभाग क्र मांक २०मध्येही पेच
पोदी, तक्का, काळुंद्रे या परिसराचा मिळून प्रभाग क्र मांक २० निर्माण झाला आहे. येथे अनुक्र मे ओबीसी, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. शेकापकडून २ जागेवर सुनील बिहरा, गणेश कडू, अजय कांडिपळे इच्छुक आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून माजी उपनगराध्यक्ष जयवंत महामुनी यांची प्रबळ इच्छा आहे. त्यांचा या प्रभागात चांगला संपर्क आहे. त्यामुळे त्यांच्याकरिता राष्ट्रवादी येथे आग्रही आहे.