दिव्यांग प्रमाणपत्र उपजिल्हा रुग्णालयात देणार
By admin | Published: April 8, 2017 01:39 AM2017-04-08T01:39:22+5:302017-04-08T01:39:22+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांनी ३ टक्के निधी खर्च करण्यास दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
मंचर : स्थानिक स्वराज्य संस्थांनी ३ टक्के निधी खर्च करण्यास दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. अपंग प्रमाणपत्र उपजिल्हा रुग्णालयात तसेच यशवंतराव चव्हाण रुग्णालय अशा अनेक शासकीय रुग्णालयांत मिळतील, असे आश्वासन अपंगकल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी दिले.
आयुक्तालयावर अपंग बांधवांनी काढलेल्या मोर्चांनंतर पाटील यांनी हे अश्वासन दिले. ससून रुग्णालयामध्ये अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अपंगांना खूप त्रास सहन करावा लागतोे. त्यांना वेळोवेळी हेलपाटे मारूनही अपंग प्रमाणपत्र मिळत नाही. अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रात्रभर रांगेत उभे राहावे लागते. येथे रांगेत उभे असताना रुग्णालयातील कर्मचारी चांगली वागणूक देत नाहीत. हा सर्व अपंग बांधवांवर होत असलेला अन्याय अपंग बांधव व त्यांच्या कुटुंबीयांचे झालेले हाल, चालविलेला अत्याचार, छळ व शोषण या कामी प्रशासनाचा अनागोंदी, मनमानी कारभार याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ससून रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
संघटनेचे मकरंद पाटे, दीपक ढोबळे, योगेश रात्नत, संजय राठोड, अनिता मेमाणे, दत्तात्रय दाभाडे, अनिता पोखरकर, दीपक गायकवाड, अविनाश लबडे, वनिता मठपती, चंद्रकांत भालेराव, विजय साठे इ. अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.
ससून रुग्णालयात आंदोलन करीत असताना अधीक्षक डॉ. अजय तावरे हे उपस्थित राहून आम्हाकडून तसेच येथील कर्मचाऱ्यांकडून अपंगांना यापुढे कुठलाही त्रास होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. अपंग व्यक्तींना शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था करू, असे आश्वासन तावरे यांजकडून देण्यात आले. हे आंदोलन सकाळी ७ ते ११ पर्यंत चालू होते. मनसे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे यांनी ससूनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ससून रुग्णालयात फक्त १२० अपंगांना प्रमाणपत्र देत असत. आता हा कोटा १५० पर्यंत करण्यात आला.
त्यानंतर आंदोलन थांबवून ससून रुग्णालय ते अपंगकल्याण आयुक्तालयापर्यंत अपंगांची रॅली काढण्यात आली. त्यानंतर कार्यकर्ते प्राणांतिक उपोषणास बसून महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. (वार्ताहर)
संघटनेची कार्यकारिणी यांनी अपंगकल्याण आयुक्त नितीन पाटील यांची समक्ष भेट घेतल्यानंतर ३ टक्के निधीबाबत यापूर्वी आम्ही सूचना दिल्या आहेत. प्रमाणपत्र वितरण करण्याबाबत सूचना उपजिल्हा रुग्णालयांना देण्यात आल्या असून फक्त शुक्रवार हा दिवस ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयंसाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याकरीता निश्चित करण्यात आला आहे. या मागण्या पूर्ण झाल्याने अपंगांनी उपोषण थांबविले.