अकोला जिल्ह्यातील दिव्यांग धीरजने सर केले किलीमांजरो हिमशिखर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 04:34 AM2019-01-29T04:34:43+5:302019-01-29T04:35:08+5:30

प्रजासत्ताकदिनी फडकविला तिरंगा; ‘लोकमत’चा फलकही झळकविला!

Divyang Dhiraj from Akola district Sir Kelly Kilimanjaro Himashikhar! | अकोला जिल्ह्यातील दिव्यांग धीरजने सर केले किलीमांजरो हिमशिखर!

अकोला जिल्ह्यातील दिव्यांग धीरजने सर केले किलीमांजरो हिमशिखर!

Next

- विजय शिंदे 

अकोट (जि. अकोला) : अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील धीरज बंडू कळसाईत या एक हात व एक पाय नसलेल्या दिव्यांगाने ज्वालामुखीच्या उद्र्रेकातून तयार झालेले दक्षिण आफ्रिकेतील सर्वात उंच असे किलीमांजरो हे हिमशिखर प्रजासत्ताकदिनी सर केले. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, धाडसाच्या बळावर अनेक अडचणींचा सामना करीत धीरजने भारताचा तिरंगा ध्वज प्रजासत्ताकदिनी पहाटे दिमाखाने फडकविला. त्यासोबतच महाराष्ट्राच्या अस्मितेचा भगवा ध्वज आणि दैनिक ‘लोकमत’चा फलकही झळकविला. भारतातून हे शिखर सर करणारा धीरज कळसाईत हा पहिला भारतीय दिव्यांग आहे.

आफ्रिका खंडातील किलीमांजरो हा सर्वात उंच पर्वत टान्झानिया देशातील ईशान्य भागातील केनियाच्या सीमेवर आहे. या शिखराची उंची १९ हजार ३४१ फूट म्हणजेच ५ हजार ८९५ मीटर आहे. विशेष म्हणजे, हा जगातील सर्वात उंच पर्वत असून, बहुतांश भाग बर्फाळ असल्याने हिमस्खलन होत असते. हा पर्वत सरळ उभा असल्याने वातावरणातील तापमान व जोराने वाहणारे वारे याचा सामना करीत धीरज कळसाईतने हे यश मिळविले. धीरज हा मुंबई येथून आपल्या चमूसह २१ जानेवारीला टान्झानियाला रवाना झाला. तेथे सर्व तयारी करून साहित्यासह बेस कॅम्प पार करीत २३ जानेवारीला चढाईला सुरुवात केली. पहाटे शिखरावर पोहोचल्यानंतर धीरजने भारत माता की जय, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवाजी- जय भवानीचा जयघोष केला. सर्वांनी राष्ट्रगीत गायले. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे जवान अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. धीरजसोबत सर्वाधिक कमी वयाचा पिंपरी चिंचवडचा साई कवडे (९ वर्षे), मुंबईच्या प्रियंका गाडे, नवी मुंबई पोलीस दलातील साताराचे मूळ रहिवासी तुषार पवार यांनीही मोहीम यशस्वी पूर्ण केली. 
मोहिमेसाठी ज्येष्ठ गिर्यारोहक सुशील दुधाणे यांनी मार्गदर्शन केले.

‘लोकमत’ने दिला मदतीचा हात!
आर्थिक परिस्थितीने हतबल असलेल्या धीरजची साहस कथा व किलीमंजारो पर्वत सर करण्याची त्याची अपेक्षा ‘लोकमत’ने मदतीचा हात सदरात प्रकाशित केली. त्यानंतर अनेक व्यक्ती, संस्था, संघटनांकडून त्याला मदतीचा ओघ सुरू झाला.

माउंट एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द : धीरजची आर्थिक स्थिती हलाखीची असून आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्याचे वडील मजुरी करतात. पैशांअभावी २०१५ मध्ये त्याच्या बहिणीचे शिक्षण थांबले. धीरजने मुक्त विद्यापीठातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द तो मनाशी बाळगून आहे.
 

Web Title: Divyang Dhiraj from Akola district Sir Kelly Kilimanjaro Himashikhar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला