दिव्यांगांची निसर्गानुभूती !

By admin | Published: October 5, 2016 04:53 PM2016-10-05T16:53:31+5:302016-10-05T16:53:31+5:30

‘नानाविधी रंगांच्या फुलांनी बहरलेली वृक्षवल्ली, त्यावर स्वच्छंद विहार करणारी मनमोहक फुलपाखरे, पक्षांचा किलबिलाट, त्यांचे या झाडावरुन त्या झाडावर झेपावणे

Divyaunga's natural beauty! | दिव्यांगांची निसर्गानुभूती !

दिव्यांगांची निसर्गानुभूती !

Next

- सविता देव हरकरे/ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि.05- ‘नानाविधी रंगांच्या फुलांनी बहरलेली वृक्षवल्ली, त्यावर स्वच्छंद विहार करणारी मनमोहक फुलपाखरे, पक्षांचा किलबिलाट, त्यांचे या झाडावरुन त्या झाडावर झेपावणे आणि वातावरणात मंद सुगंध पसरविणारा गार वारा’ हा अनुभवच त्यांच्यासाठी नवखा आणि जीवनात नवरंगाची उधळण करणारा होता. ही निसर्गानुभूती निश्चितच त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करणारी होती. दिव्यांग म्हणून एरवी वेगळी पडणारी ही बालगोपाल मंडळी नागपुरातील राजभवनात निसर्गाची सैर करताना मात्र पक्षांप्रमाणे मनसोक्त बागडत होती. निसर्गाच्या सान्निध्यात आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहात होता. निमित्त होते वन्यजीव सप्ताहाचे!
वन विभागातर्फे यंदा वन्यजीव सप्ताहानिमित्त काही अनोखे आणि आनंददायी उपक्रम राबविण्यात आले. लहान मुले आणि तरुण पिढीला त्यात अधिकाधिक सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न झाला. त्याअंतर्गत दिव्यांगांना घडविण्यात आलेली राजभवनाची सफर खऱ्या अर्थाने फलदायी ठरली. जैवविविधतेने नटलेला राजभवन परिसर आणि तेथील नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन सर्वसामान्यांना मिळणे तसे दुर्लभच. पण शहरातील काही दिव्यांग मुलांना हा निसर्ग मनसोक्त अनुभवता आला. येथील जैवविविधता उद्यानातील विविध प्रजातींच्या झाडांची ओळख करुन घेता आली. फुलपाखरु उद्यानात रंगीबेरंगी फुलपाखरांसोबत खेळण्याचा आनंद लुटता आला. नक्षत्रवन आणि गुलाबवनाने तर त्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले. याशिवाय दिव्यांगांसाठी निसर्ग गीत गायन स्पर्धाही घेण्यात आली. नागलवाडी, हिंगणा येथील ज्ञानज्योती अंध विद्यालयातील दिव्यांगांनी सादर केलेली एकाहूनएक सरस गाणी ऐकून वन अधिकाऱ्यांसह सर्व उपस्थितांना सुखद धक्का बसला.


यंदा वन्यजीव सप्ताहाचा ओनामा पक्षी निरीक्षणाने झाल्याने त्यात जिवंतपणा आला होता. अंबाझरी आणि सेमिनरी हिल्स परिसरात युवापिढीने निसर्गाला साद देत येथील पक्षांसोबत हितगूज केले. त्यांना जाणून घेतले. जवळपास ८० पक्षांची नोंद यावेळी करण्यात आली. त्यानंतर डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या भिंतींवर विविध रंगांची उधळण करीत जंगल आणि वन्यजीव संवर्धनाचा संदेश त्यांनी दिला. चित्रकला महाविद्यालयाच्या कलादालनात आयोजित वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन आणि बर्डरेस विशेष आकर्षण ठरले. दिव्यांग मुले आणि तरुण पिढीच्या उत्साहाने वन्यजीव सप्ताहाचा आनंद द्विगुणीत झाला. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची रुपरेषा आखण्यात आली आणि अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. रामबाबू, सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी किशोर मिश्रिकोटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश धोटेकर यांच्यासह इतर वन अधिकाऱ्यांनी ती प्रत्यक्षात साकारण्यास परिश्रम घेतले. बर्डस् आॅफ विदर्भच्या चमूचा यात विशेष सहभाग राहिला.


बालवयापासूनच मुलांमध्ये निसर्गाप्रती प्रेम निर्माण व्हावे. वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाबाबत त्यांच्यात जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने यंदाच्या वन्यजीव सप्ताहात काही नवे उपक्रम राबविण्यात आले. त्याची फलश्रृती निश्चित मिळेल.
- डॉ. रामबाबू
अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

Web Title: Divyaunga's natural beauty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.