लालपरी बंद करण्याचा रावतेंचा डाव; मनसेचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 08:06 PM2018-11-29T20:06:05+5:302018-11-29T20:11:28+5:30
परिवहन मंत्र्यांची मनमानी हाणून पाडण्याचा मनसेचा इशारा
सिंधुदुर्ग : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. मात्र हा डाव मनसे हाणून पाडेल. मंत्री रावते यांना लालपरी बंद करून शिवशाही बस सुरू करण्याचा विचार आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अध्यक्ष हरी माळी यांनी केला आहे. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी एसटी भ्रष्टाचाराचे आगार बनल्याचा आरोपही केला. यावेळी सुनील जाधव, बनी नाडकर्णी, राजू कासकर, सुहास मेढे उपस्थित होते.
माळी म्हणाले, मंत्री दिवाकर रावते हे फक्त शिवसेनेच्या कामगार संघटनेचे ऐकतात. त्यांना फक्त शिवसेनेची संघटना वाढवायची आहे. त्यामुळे ते इतर संघटनांचे ऐकत नाहीत. राज्यातील सर्व आगारप्रमुखांना तसे आदेश त्यांनी दिले आहेत, असा आरोप करत एसटीमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. जुन्या एसटीचे लाल डबे बदलून, आहे ते पार्ट वापरून रस्त्यावर आणण्याचा घाट घातला जात आहे, असा दावा त्यांनी केला. 'रायगडमध्ये अशा शंभर एसटी बसेस रस्त्यावर आणण्यात आल्या आहेत. याचे पुरावे आमच्याकडे आहेत. शिवशाही बसचे सर्वात जास्त अपघात झाले. या विरोधात मनसेने आवाज उठवला. मात्र परिवहन मंत्री सतत संघटना आवाज उठवतात म्हणून एसटीच्या कार्यालयात यायचे बंद झाले. मंत्रालयात ते कुणाला भेटत नाहीत. एसटीच्या जागा त्यांना विकायच्या आहेत. यातून रावतेंना खाजगीकरण करायचे हे सिध्द होते. मनसे कामगार सेना एसटीचे खाजगीकरण हाणून पाडणार असल्याचा इशारा यावेळी माळी यांनी दिला.
मनसे रस्त्यावर उतरणार
मंत्री रावते यांची वाटचाल लालपरी बंद करण्याच्या दिशेने सुरू आहे. अनेक जिल्ह्यात लालपरीचा रंग बदलण्याचे काम सुरू आहे. अधिकाऱ्यांची भेट घेतली, तर ते अशीच उत्तरे देतात. तसेच एसटीच्या आगाराचे काम गरज नसताना काढले जात आहे, असा आरोप करत मनसे या विरोधात रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी माळी यांनी दिला.