Diwali 2018 : दिवाळी कोकणी मुलखातली!  

By बाळकृष्ण परब | Published: November 6, 2018 06:40 AM2018-11-06T06:40:43+5:302018-11-06T06:56:57+5:30

खरंतर कोकणात मालवणी मुलखात चतुर्थी आणि शिमगा हे मोठे सण. दिवाळीला कोकणात चतुर्थीसारखा उत्साह, जल्लोष दिसून येत नाही. पण मालवणी माणूस साधेपणाने का होईना दिवाळी साजरी करतोच. अन् या साधेपणातही आपल्या परंपरेचा वेगळेपणा कोकणी माणसाने जपलाय. 

Diwali 2018: Diwali in South Konkan | Diwali 2018 : दिवाळी कोकणी मुलखातली!  

Diwali 2018 : दिवाळी कोकणी मुलखातली!  

प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीला सुरुवात झाली आहे. घराची साफसफाई आणि रंगरंगोटीची कामे आवरून व खरेदी, फराळाची लगबग आटोपून सारेजण आता दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. आकाशकंदील, चमचमत्या चांदण्या आणि पणत्यांच्या शीतल प्रकाशाने दिशा उजळून निघाल्या आहेत. आमच्या कोकणातही सगळी गावकरी शेतीभातीची कामं सांभाळून दिवाळीचे स्वागत करत आहे. खरंतर कोकणात मालवणी मुलखात चतुर्थी आणि शिमगा हे मोठे सण. हे दोन सण म्हणजे कोकणी माणसाचा जीव की प्राण. त्या तुलनेत दिवाळीला कोकणात चतुर्थीसारखा उत्साह, जल्लोष दिसून येत नाही. एकतर दसरा, दिवाळी हे सण सुगी सराईच्या दिवसांत येत असल्याने शेतकरी कोकणी माणसाला या दिवसांत थोडीशीही उसंत मिळत नाही. त्यामुळे चतुर्थीप्रमाणे दिवाळसणही धडाक्यात साजरा करणं कोकणी माणसाला शक्य होत नसावं. तरीही मालवणी माणूस साधेपणाने का होईना दिवाळी साजरी करतोच. अन् या साधेपणातही आपल्या परंपरेचा वेगळेपणा कोकणी माणसाने जपलाय. 

 गावच्या दिवाळीची सुरुवात होते ती नरकचतुर्दशीला. या दिवशी घरातील न्हाणीघरात असलेल्या मडक्याला खडूने रंगवून कारिटाच्या फळांची माळ घातली जाते. तर नरकचतुर्दशीला बनवले जाणारे नरकासूर हे तवकोकणाचं खास वैशिष्ट्य. मग रात्रभर या नरकासुरांना नाचवून भल्या पहाटे त्याचं दहन केलं जातं. मग पहाटे उटणं आणि खोब-याचा रस लावून पहिली आंघोळ होते. आंघोळ झाल्यावर तुळशी वृंदावनासमोर नरकासूराचं प्रतीक असलेलं कारीट मोठ्याने गोयना गोयना (गोविंदा गोविँदा) म्हणत फोडलं जातं. या दिवशी सकाळी सगळ्यात आधी उठून गोविंदा गोविंदा म्हणण्याची चुरस गावकऱ्यांमध्ये असते. "अरे त्या वरच्या दाजीन न्हावन धूवन फाटेक पाच वाजताच गोयना गोयना केल्यान. आणि तुम्ही आजून हतरुनात लोळतात कसले,'' असं म्हणून घरातील जाणते बच्चे कंपनीला पहाटे उठवतात. नुकतीच थंडी पडू लागलेली असते, त्यामुळे हवेत गारवा असतो. त्यामुळे पहिली आंघोळ करताना गारवा जाणवत असतो. गावात मोती साबणाचं फॅड नसलं तरी अंगावर लावला जाणारा ओल्या खोबऱ्याचा रस एक वेगळाच अनुभव देत असतो. 

 एव्हाना घरात गोडे फॉव (पोहे) बनून तयार असतात. पण हे गोड फॉव खाण्याआधी एका कडू परीक्षेचाही सामना करावा लागतो. या दिवशी सकाळी सातिवन नावाच्या औषधी वृक्षाचा कडू रस पिण्याची प्रथा आहे. खरंतर दिवाळीसारख्या गोडवा वाढवणाऱ्या सणामध्ये आरोग्य संवर्धनाचा संदेश यामधून आपल्या पूर्वजांनी दिला असावा. पण हा सातिवनाचा रस पिण्याच बच्चे कंपनी आढेवेढे घेते. काही जण रडारडही करतात. पण "जे सातिवनाचो रस पिवचे नाय त्यांका, फॉव मेळाचे नाय, असं आई, आजी वगैरे मंडळी बजावतात, त्यामुळे नाईलाजाने का होईना या सातिवनाच्या रसाचा एखादा घोट गळ्याखाली जातो. मग पोह्यांवर ताव मारला जातो. शेतात नुकत्या पिकून तयार झालेल्या भातापासून बनवलेल्या पोह्यांची चव वेगळीच असते आणि या पोह्यांच्या गोडव्याने सतिवनाच्या रसामुळे जिभेला आलेला कडवटपणाही निघून जातो.  

घरातील गोड्या पोह्यांचा फराळ झाल्यावर वाडीतील सगळ्यांकडे फराळासाठी जाण्याची आमच्या वाड्यात परंपरा आहे. सकाळी सकाळी घरातील कार्यक्रम आटोपल्यावर जाणती मंडळी आणि बच्चेकंपनी वाड्यातील मूळ घराकडे जमतात. तिथून प्रत्येक घरी फराळ करण्यासाठी फिरण्यास सुरुवात होते.  काही वर्षांपूर्वीपर्यंत फराळात गोडे पोहेच दिले जायचे. मात्र आता बदलत्या काळाप्रमाणे लाडू, चकल्या, शंकरपाळ्या यांचाही फराळात समावेश झालाय. आता शहरांप्रमाणेच गावातही सुबत्ता आल्याने खाण्यापिण्याबाबत कुणाला कुतुहल राहिलेले नाही.पण वाडतील एकोपा टिकवण्यासाठी अशी परंपरा उपयोगी पडते. मग लक्ष्मीपूजन संपन्न होते. 


मालवणी मुलखातल्या दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो तो पाडव्याचा. कृषिआधारित व्यवस्थेमुळे पाडवा शेतक-यांसाठी विशेष जिव्हाळ्याच सण. खरंतर गावातील खरी दिवाळी ही या दिवसापुरतीच. पाडव्यादिवशी सकाळीच बैल, गाई, म्हशींना चरून आल्यावर आंघोळ घालून स्वच्छ केले जाते. मग त्यांच्या शिंगांना रंग लावला जातो. हे झाल्यावर गोठ्यात शेणाचा प्रतीकात्मक गोठा तयार केला जातो. हा गोठा पण वैशिष्ट्यपूर्ण असतो. शेणाने तयार केलेल्या गोठ्यामध्ये कारिटाचे बैल आणि काड्यांपासून तयार केलेले गुराखी ठेवले जातात.  कारिटाच्या फळांना काड्या टोचून बैल तयार केले जातात. घरात जेवढे गोधन असेल तेवढे बैल या गोठ्यात ठेवले जातात. "ह्यो माझो ढवळो बैल, ह्यो माझो बाळो बैल'' म्हणून बच्चे कंपनी उत्साहात हा गोठा तयार करतात. या गोठ्याची मग विधिवत पूजा केली जाते. गोठ्यातील गुरांना पोळ्यांचा नैवैद्य दाखवून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते.  संध्याकाळी गावातील सातेरीच्या मंदिरात पणत्यांची आरास केली जाते. तसेच एकत्रितपणे फटाके फोडले जातात.  आणि खऱ्या अर्थाने हा दिवस उत्साहात साजरा होतो. 



भाऊबिजेच्या दिवशी घरगुती कार्यक्रम सोडले तर फारशी गडबड नसते. दिवाळीचे हे पहिले चार दिवस आटोपल्यावर दिवाळसणाची औपचारिकता संपते. पण गावातल्या दिवाळीचा शेवटचा दिवस असतो तो तुळशी विवाहाचा. घराच्या अंगणात असलेल्या तुळशीला रंगवून सजवून संध्याकाळी तिचा विवाह लावला जातो. यासाठी घरातील एखादा गोविंदा बनतो. तुळशीच्या विवाह झाला की चुरमुऱ्यांचा प्रसाद दिला जातो. हे चुरमुरे जमवणे हा पण एक गमतीशीर अनुभव असतो. तुळशीचे लग्न लागले की गावातल्या दिवाळीची सांगता होते आणि गावकरी मंडळी पुढे येणाऱ्या ग्रामदेवतांच्या जत्रांच्या तयारीला लागते!!!
 

Web Title: Diwali 2018: Diwali in South Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.