Diwali 2021: यंदाच्या वर्षी नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन एकाच दिवशी; जाणून घ्या 1 ते 5 नोव्हेंबरचे पंचांग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 08:20 AM2021-11-01T08:20:05+5:302021-11-01T08:20:29+5:30
Diwali Days: यंदा गुरुवार, ४ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी - कुबेरपूजन हे महत्त्वाचे सण एकाच दिवशी आले आहेत. या दिवसांविषयी पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी माहिती दिली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदा गुरुवार, ४ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी - कुबेरपूजन हे महत्त्वाचे सण एकाच दिवशी आले आहेत. सोमवारी वसूबारस असून, मंगळवारी धनत्रयोदशी आहे. शुक्रवारी दिवाळी पाडवा आणि शनिवारी भाऊबीज आहे. या दिवसांविषयी पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी माहिती दिली.
सोमवार, १ नोव्हेंबर रोजी रमा एकादशी आहे. याच दिवशी प्रदोषकाली अश्विन कृष्ण द्वादशी असल्याने याच दिवशी गोवत्स द्वादशी - वसुबारस आहे.
मंगळवार, २ नोव्हेंबर रोजी गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, धन्वंतरी पूजन आणि यमदीपदान आहे. अश्विन कृष्ण द्वादशी रोजी श्रीदत्तात्रेयाचे एक अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची पुण्यतिथी असते. म्हणून या दिवसास ‘गुरुद्वादशी‘ असेही म्हणतात. या दिवशी प्रदोषकाली अश्विन कृष्ण त्रयोदशी असल्याने याच दिवशी धनत्रयोदशी - धन्वंतरी पूजन आहे.
बुधवार, ३ नोव्हेंबर रोजी आश्विन कृष्ण चतुर्दशी क्षयतिथी आहे. या दिवशी दीपावलीचा कोणताही सण नाही.
गुरूवार, ४ नोव्हेंबर रोजी नरकचतुर्दशी, अभ्यंगस्नान, लक्ष्मी कुबेर पूजन, अलक्ष्मीनिस्सारण, महावीर निर्वाण आहे. या दिवशी चंद्रोदयाच्यावेळी पहाटे ५.४९ वाजता अश्विन कृष्ण चतुर्दशी असल्याने याच दिवशी नरकचतुर्दशी आहे. चंद्रोदयापासून म्हणजे पहाटे ५.४९ वाजल्यापासून सूर्योदयापर्यंत म्हणजे सकाळी ६.४१ वाजेपर्यंत अभ्यंगस्नान करावयाचे आहे.
गुरूवार, ४ नोव्हेंबर रोजी प्रदोषकाली अश्विन कृष्ण अमावास्या असल्याने प्रदोषकालात सायंकाळी ६.०३ पासून रात्री ८.३५पर्यंत लक्ष्मी-कुबेरपूजन करावयाचे आहे.
शुक्रवार, ५ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुक्ल प्रतिपदा, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, विक्रम संवत् २०७८ प्रमादीनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. तसेच महावीर जैन संवत् २५४८चा प्रारंभ होत आहे. याचदिवशी गोवर्धन पूजन आणि अन्नकूट आहे. शनिवार, ६ नोव्हेंबर रोजी यमद्वितीया- भाऊबीज आहे.
पुढच्या वर्षी सूर्यग्रहण
पुढील वर्षी अश्विन कृष्ण अमावास्येच्या दिवशी मंगळवार, २५ ऑक्टोबर २०२२ रोजी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसेल, असे सोमण यांनी सांगितले. पुढील वर्षी दिवाळी १० दिवस अगोदर येणार आहे.