शेतक-यांची दिवाळी अंधारात!

By admin | Published: October 24, 2014 11:21 PM2014-10-24T23:21:08+5:302014-10-24T23:26:38+5:30

पश्‍चिम व-हाडातील सोयाबीन उत्पादनात एकरी ७0 टक्के घट.

Diwali of the farmers in darkness! | शेतक-यांची दिवाळी अंधारात!

शेतक-यांची दिवाळी अंधारात!

Next

ब्रम्हानंद जाधव / मेहकर (बुलडाणा)
कापसाचा पेरा सातत्याने आतबट्ट्याचा व्यवहार ठरू लागल्यामुळे, गत काही वर्षात कापूस उत्पादक पट्टा ही ओळख मिटवून सोयाबीन उत्पादक पट्टा अशी नवी ओळख निर्माण केलेल्या पश्‍चिम वर्‍हाडातील शेतकर्‍याला, यावर्षी सोयाबीननेदेखील प्रचंड तडाखा दिला असून, सोयाबीनच्या दर एकरी उत्पादनात तब्बल ७0 टक्के घट झाली आहे.
पश्‍चिम वर्‍हाडात समावेश होणार्‍या अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये यावर्षी सुमारे ८ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. सोयाबीन उत्पादनासाठी शेतकर्‍यांना एकरी सरासरी सुमारे १५ हजार ६00 रुपये खर्च आला आहे. दुर्दैवाने निसर्गाची साथ न मिळाल्याने यावर्षी सोयाबीनला शेंगा तर कमी लागल्याच; पण शेंगांमधील दाणेही अक्षरश: ज्वारीच्या आकाराचे आहेत. पावसाने लांबलचक उघडीप दिल्याने सोयाबीनच्या उत्पादनाला प्रचंड फटका बसला आहे. परिणामी दर एकरी उत्पादनात तब्बल ७0 टक्के घट झाली आहे. यावर्षी पावसाला उशिरा प्रारंभ झाल्यामुळे मूग, उडीद आदी कमी कालावधीच्या पिकांचा फार कमी पेरा झाला, तर बहुतांश शेतकर्‍यांनी प्रमुख पीक म्हणून कापसाऐवजी सोयाबीनला पसंती दिली. त्यामुळे दिवाळीत हातात पैसा खुळखुळण्याऐवजी, शेतकर्‍याच्या हाती खुळखुळाच आला आणि त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारातच गेली.
पश्‍चिम वर्‍हाडात यावर्षी १६ लाख ३१ हजार ४00 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी करण्यात आली होती. त्यामध्ये सोयाबीनचा पेरा सर्वाधिक म्हणजे ८ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर झाला. सोयाबीन पिकासाठी शेतकर्‍यांना यावर्षी एकरी सुमारे १५ हजार ६00 रुपये खर्च आला आहे. पेरणीपूर्व मशागत व पेरणीचा खर्च २ हजार १00 रुपये, बियाणे व खतावरील खर्च ३ हजार ५00 रुपये, आंतरमशागत खर्च ४ हजार ५00 रुपये, पीक फवारणी खर्च २ हजार रुपये, काढणी खर्च २ हजार ५00 रुपये आणि वाहतूक खर्च १ हजार रुपये असा त्याचा तपशील आहे.

Web Title: Diwali of the farmers in darkness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.