दिवाळीही ‘ताप’दायक!
By Admin | Published: October 31, 2016 03:43 AM2016-10-31T03:43:52+5:302016-10-31T03:43:52+5:30
पालिकेचा आरोग्य विभाग कितीही नाकारत असला, तरी कल्याण-डोंबिवलीकरांसाठी संपूर्ण पावसाळा ‘ताप’दायक ठरला आहे
प्रशांत माने,
कल्याण- पालिकेचा आरोग्य विभाग कितीही नाकारत असला, तरी कल्याण-डोंबिवलीकरांसाठी संपूर्ण पावसाळा ‘ताप’दायक ठरला आहे. गेल्या आठवडाभरात वाढत गेलेल्या थंडीने व्हायरल फिव्हर, फटाक्यांच्या धुराचे प्रदूषण, धुळीचा त्रास आणि प्रदूषणामुळे थंडी-ताप, घसादुखीचे रूग्ण वाढले आहे. ऐन दिवाळीच्या सुट्टीत दवाखान्यांत पेशंटची गर्दी पाहायला मिळते आहे.
या दोन्ही शहरांत गेल्या पाच महिन्यात तापाचे तब्बल ३८ हजार ३१० रूग्ण पालिकेलाच आढळले आहेत. या कालावधीत डेंग्यूने थैमान घातले असतानाच मलेरिया, गॅस्ट्रो, काविळ, लेप्टोस्पायरोसीस, टायफॉईड, कॉलरा या आजारांचे रूग्णही मोठ्या प्रमाणावर आढळले आहेत.
विशेष पथकांमार्फत जागोजागी सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगत दोन्ही शहरांमध्ये कोणतीही साथ नसल्याचा दावा आरोग्य विभाग करीत असला तरी आता थंडीच्या मोसमाच्या बदलत्या वातावरणात ‘व्हायरल तापाचा’ने हात-पाय पसरले आहेत.
जूनपासूनच मोठया प्रमाणावर तापाचे रूग्ण आढळत होते.त्यावेळी कोणतीही साथ नसल्याचा निर्वाला पालिकेने दिला होता. पावसाळयानंतरही तापाची स्थिती कायम राहिली आहे.
जून ते आॅक्टोबर या पाच महिन्यांच्या काळात व्हायरल फिव्हरसह डेंग्यूचेही थैमान दोन्ही शहरांत दिसून आले असून यात आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. परंतु पालिकेच्या लेखी ते डेंग्यूचे ‘संशयित’ असल्याने त्यांच्या लेखी आजही केवळ दोघांचाच मृत्यू डेंग्युने झाल्याची नोंद आहे. यातील १ मृत रूग्ण केडीएमसीतील, तर दुसरा २७ गावांमधील आहे.
>खाद्यपदार्थांच्या गाड्या जैसे थे
उघडयावरचे अन्न खाऊ नये असे आवाहन महापालिका करत असली, तरी अशा हातगाड्यांना पालिकेकडूनच अभय दिले जात आहे. कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक, महत्वाचे चौक, उद्याने, कॉलेज परिसरात अशा गाड्या सर्रास पाहायला मिळतात. या कारवाईत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप होतो. ज्या गाड्या राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने चालतात, त्यांच्याकडे कानाडोळा केला जातो.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचेही आरोग्य बिघडल्याने शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नाही. त्यातून डास वाढतात आणि डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना पोषक वातावरण तयार होते. शहराच्या ‘ताप’दायक स्थितीला एकप्रकारे आरोग्य विभागही कारणीभूत ठरला आहे. वैद्यकीय आरोग्य विभागाने कल्याण डोंबिवलीतील पाच लाख घरांचा सर्व्हे केला. २० लाख ७६ हजार २०३ नागरिकांची तपासणी केली. यात ३८ हजार ३१० तापाचे रूग्ण आढळून आले. त्यांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेतले. त्यांना डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, काविळ, लेप्टोस्पायरोसीस, टायफॉईड, कॉलराची लागण झाल्याचे समोर आले आहे. खाजगी रूग्णालयांना तापाच्या रूग्णांची माहिती देण्यास सांगण्यात आले असले तरी ते सहकार्य करत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
>पुन्हा वाढले डास...
फवारणी अपुरी
मलेरियाने एकाचा, तर काविळीने दोघांचा बळी घेतला. परंतु ते ‘संशयित रूग्ण’ असल्याचे संबंधित विभागाचे म्हणणे आहे. आताही डासांचे प्रमाण प्रचंड वाढले असतानाही फवारणी जवळपास होत नसल्याचे दिसून येते.
जूनपासूनचा आढावा घेता मलेरियाचे 422काविळीचे 804टायफॉईडचे 569लेप्टोस्पायरोसीसचे १९, गॅस्ट्रोचे 354कॉलराचे १२ आणि चिकनगुनियाचे पाच रूग्ण आढळून आले. याच काळात डेंग्यूचे 1744संशयित रूग्ण आढळून आले. यातील 1261रूग्ण महापालिका क्षेत्रातील असून 187रूग्ण पालिकेच्या कार्यक्षेत्राबाहेरील आहेत. २७ गावांमध्येही रूग्ण पालिकेच्या कार्यक्षेत्राबाहेरील आहेत. २७ गावांमध्येही 296डेंग्यूचे रूग्ण आढळले असले, त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात डेंग्यूचेच उपचार सुरू असले तरी पालिकेच्या लेखी ते ‘संशयित’ आहेत.