दिवाळी भेट स्वीकारण्यास नकार
By admin | Published: November 14, 2015 03:50 AM2015-11-14T03:50:45+5:302015-11-14T03:50:45+5:30
दिवाळीनिमित्त एसटी कामगारांना २,५00 रुपये दिवाळी भेट देण्यात आली. मात्र ही भेट राज्यातील काही एसटी कामगारांकडून नाकारण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले
मुंबई : दिवाळीनिमित्त एसटी कामगारांना २,५00 रुपये दिवाळी भेट देण्यात आली. मात्र ही भेट राज्यातील काही एसटी कामगारांकडून नाकारण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. एसटी अधिकाऱ्यांना ५ हजार रुपये देऊन भेदभाव निर्माण करण्यात आल्यानेही ही भेट नाकारण्यात येत आहे.
एसटी महामंडळ तोट्यात असल्याने दिवाळी भेट किंवा सानुग्रह अनुदान मिळणार नाही, असा पवित्रा परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला होता. यामुळे एसटी कामगारांकडून नाराजी व्यक्त केली जात असतानाच १० हजार रुपये सण उचल देण्याचा निर्णय महामंडळाने घेत कामगारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र सरसकट १० हजार रुपये दिवाळी भेट सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी कामगार संघटनांनी केली. त्यानंतर याबाबत परिवहन मंत्र्यांनी लक्ष देत कामगारांना अडीच हजार रुपये आणि अधिकाऱ्यांना ५ हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला.
ही मागणी कामगार संघटनांकडूनही मान्य करण्यात आली. मात्र सरसकट सर्वांना समान दिवाळी भेट देण्याची मागणी केली असतानाही त्यात भेदभाव करण्यात आला. यामुळे काही कामगारांकडून अडीच हजार रुपये रुपये नाकारण्यात येत असून, तसे पत्रकच संबंधित आगार व्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. याबाबत मान्यताप्राप्त युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. तर महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.