दिवाळी भेटीचा चेंडू कामगार संघटनेच्या कोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2016 05:03 AM2016-10-13T05:03:29+5:302016-10-13T05:03:29+5:30
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केलेली १५ हजार रुपये दिवाळी बोनसची मागणी परिवहनमंत्री व महामंडळाच्या अध्यक्ष दिवाकर रावते यांनी अव्यवहार्य
विलास गावंडे / यवतमाळ
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केलेली १५ हजार रुपये दिवाळी बोनसची मागणी परिवहनमंत्री व महामंडळाच्या अध्यक्ष दिवाकर रावते यांनी अव्यवहार्य ठरविली असून, कामगारांची दिवाळी उत्साहात व्हावी, असे वाटत असेल, तर न्यायालयात दाखल याचिका मागे घ्या, असा सल्ला देण्यात आला आहे. बोनसचा प्रश्नही कामगार संघटनेच्या कोर्टात टाकण्यात आला आहे. मात्र, कामगारांचे लक्ष महामंडळाच्या निर्णयाकडे लागले आहे.
दिवाळी बोनसची मागणी विविध कामगार संघटनांनी लावून धरली आहे. कामगार संघटनेने १५ हजार रुपये बोनसच्या मागणीचे पत्र महामंडळाला दिले आहे. एवढेच नाही, तर १४ आॅक्टोबर रोजी बोनससह विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. परिवहनमंत्र्यांनी कामगार संघटनेच्या या पत्राला उत्तर देताना महामंडळाच्या परिस्थितीची आणि संघटनेने कामगारांसाठी काय केले, याची जाणीव करून दिली आहे. महामंडळाचे उत्पन्न घटत असल्याचे माहीत असतानाही १५ हजार रुपये दिवाळी भेट मागणे धारिष्ट्याचे आहे. मागणी पूर्णत: अव्यवहार्य असल्याचे नमूद केले आहे, पण कामगारांची दिवाळी उत्साहात जावी, असे वाटत असेल, तर ‘ती’ याचिका मागे घ्या, असे सुचविण्यात आले आहे. १९९६-२००० च्या करारातील तरतुदीनुसार थकबाकी रकमेतून पाच टक्के रक्कम मान्यताप्राप्त संघटनेकडे वर्ग करण्यात आली होती. प्रती कामगार एक हजार रुपये याप्रमाणे सव्वा लाख कामगारांचे कोट्यवधी रुपये संघटनेकडे जमा झाले आहेत.