उल्हासनगर भाजपात दिवाळीचे भुईनळे
By admin | Published: October 31, 2016 03:49 AM2016-10-31T03:49:55+5:302016-10-31T03:49:55+5:30
भाजपामधील एका गटाच्या विरोधामुळे मुख्यमंत्री वेळ देत नसल्याने ओमी टीम नाराज
उल्हासनगर : भाजपामधील एका गटाच्या विरोधामुळे मुख्यमंत्री वेळ देत नसल्याने ओमी टीम नाराज झाली असून लवकर निर्णय न घेतल्यास राष्ट्रवादीतून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या टीमला विरोध केल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली असून त्यातून माजी आमदार कुमार आयलानी यांचे पद धोक्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
ओमी टीमचा दिवाळीनंतर भाजपा प्रवेश होणार असल्याची चर्चा रंगलेली असताना मी भाजपातून नव्हे, तर राष्ट्रवादीतून निवडणुका लढविणार असल्याची प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी दिली. मुख्यमंत्र्यानी ओमी टीमचा प्रवेश लांबवल्यानेच ते कमालीचे नाराज झाल्याचे बोलले जाते. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील राज्यमंत्र्यांचीच आता कसोटी लागली आहे.
नगरपालिका निवडणुकीत जरी शिवसेना भाजपाची युती झाली असली, तरी ती महापालिकेत नसेल, असे दोन्ही पक्षांचे नेते खाजगीत सांगत आहेत. त्यामुळे उल्हासनगर पालिका एकहाती ताब्यात ठेवायची असेल, तर ओमी कलानी टीमला पक्षात सामावून घ्या, असे सांगेत पक्षातील एक गट प्रयत्नशील होता. मात्र वेगवेगळ््या कारणांनी हा प्रवेश लांबला आहे. याबाबत ओमी यांनाच थेट विचारणा केली असता, त्यांनी भाजपातून नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणार असल्याची तिखट प्रतिक्रिया दिली.
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीच आम्हाला पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिले होते. शहराच्या विकासासाठी उपयोग होईल म्हणून आम्हीही त्याचा विचार केला. शिवसेना-भाजपाच्या गेल्या दशकाच्या सत्ताकाळात शहर भकास झाले. एकही योजना पूर्ण झाली नाही. त्यामुळे अशा अपयशी भाजपा नेत्यांसोबत जाण्यापेक्षा राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढू, असे ओमी कलानी म्हणाले.
ओमी टीम भाजपात आली नाही. भाजपा-शिवसेनेची युती झाली नाही, तर पक्षाच्या नगरसेवकांची संख्या ११ वरून पाच ते सहा इतकी कमी होईल, अशी माहिती पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य नगरसेवकांनी दिली.
भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष महेश सुखरामानी, जमनुदास पुरस्वानी, जिल्हा महासचिव प्रदीप रामचंदानी, लाल पंजाबी, प्रकाश मखिजा, राम चार्ली आदींनी ओमी टिमला प्रवेश द्यावा, यासाठी थेट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्र्याची भेट घेऊन निवेदन दिले होते. तर पक्षातील दुसऱ्या गटाने विरोधाचा ठराव मंजूर केला होता.
>रिपाइं भाजपासोबत
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर जिल्हा रिपाइंच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री-पक्षाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यात आठवले यांनी शिवसेनेशी युतीची चर्चा करू नका, अशी तंबी दिली असून शिवसेना-भाजपाची युती झाली नाही, तरी भाजपा-रिपाइंची युती होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
>आयलानी यांची उचलबांगडी?
ओमी टीमचा पक्ष प्रवेश झाला नाही, तर भाजपातील एक गट कुमार आयलानी यांच्याविरोधात उभा ठाकणार आहे. त्यांना आयलानी यांचे वर्चस्व नको असून त्यातील अनेकांनी शिवसेनेसह ओमी टीमशी संधान साधल्याचे बोलले जाते. पक्ष एकसंध ठेवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर कुमार आयलानी यांची शहरजिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. ते पद विरोधी गटाला मिळण्याची शक्यता आहे.