कल्याण-डोंबिवलीमध्ये कोंडीतच दिवाळी

By admin | Published: November 2, 2016 03:04 AM2016-11-02T03:04:11+5:302016-11-02T03:04:11+5:30

भाऊबीजेनिमित्त मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहने वाढल्याने कल्याण-डोंबिवलीत सोमवारी दिवसभर ठिकठिकाणी वाहतुक कोंडी होती

Diwali in Kalyan-Dombivali; | कल्याण-डोंबिवलीमध्ये कोंडीतच दिवाळी

कल्याण-डोंबिवलीमध्ये कोंडीतच दिवाळी

Next


कल्याण : रस्त्याची कोणतीही कामे नसूनही आणि सुटीचा माहोल असूनही भाऊबीजेनिमित्त मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहने वाढल्याने कल्याण-डोंबिवलीत सोमवारी दिवसभर ठिकठिकाणी वाहतुक कोंडी होती. वाहतुक पोलिसांच्या नियोजनाचा अभाव, वाहनचालकांतील बेशिस्त, दुकानांचे अतिक्रमण आणि फेरीवाल्यांमुळे पाऊण ते एक तास वाहने एकाच ठिकाणी खोळंबल्याने वाहनचालकांसह प्रवासीही पुरते बेजार झाले. कोडींचा हा सिलसिला सायंकाळपर्यंत सुरूच होता. या कोंडीमुळे ठाकुर्ली-दिवा येथील रेल्वे फाटके दीर्घकाल खुली राहिल्याने लोकल वाहतूकही खोळंबली.
कल्याणमधील वालधुनी उड्डाणपूल, सुभाष चौक, मुरबाड रोड, रेल्वे स्थानक परिसर, पत्रीपुल, शीळ मार्ग, शिवाजी चौक, सहजानंद चौक, लालचौकी, दुर्गाडी चौक, दुर्गाडी उड्डाणपुल आदी ठिकाणी वाहतुक कोंडी होती. वालधुनी पूल ते रेल्वे स्थानक या साधारण १० मिनिटांच्या अंतराला कोंडीमुळे पाऊणतासाचा कालावधी लागत होता. कल्याणमधील या जम्बो कोंडीचा फटका पुढे डोंबिवली शहरालाही बसला. यात मानपाडा चाररस्ता, दत्तमंदिर चौक, टंडन रोड, नांदिवली रोड, कोपर उड्डाणपुल, आयरे रोड, शास्त्रीनगर, घरडा सर्कल ते टिळक चौक या मार्गांवरील वाहतुक पुरती खोळंबली होती.
त्यावर उपाय म्हणून वाहतुक पोलिसांनी कल्याणला जाणारी वाहतुक समांतर मार्गावरून वळवण्यात आली होती.
खरेदीसाठी स्वत:चे वाहन घेऊन बाहेर पडणारे नागरिक आणि शहरातील वाहनांची दिवसागणिक वाढणारी संख्या यामुळे कोंडीत भर पडल्याचे वाहतुक पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
>फतवे कागदावरच
शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी वाहतूक शाखेकडून अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सकाळी ९ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी आहे. यासारखे अनेक फतवे यापूर्वीही जारी करण्यात आले आहेत. परंतु त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. सिग्नल यंत्रणा तसेच अन्य सुविधांसाठी केडीएमसीकडून सहकार्य मिळत नाही, अशी ओरड वाहतूक शाखेकडून होते.
अवजड वाहतुकीच्या निषेधार्थ चार दिवसांपूर्वी कल्याणच्या रिक्षाचालकांनी काही वेळ रिक्षा बंद ठेवल्या होत्या. दुर्गाडी चौक ते पत्रीपूल या महत्वाच्या मार्गावर वाहने पार्क करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसा ठराव केडीएमसीने मंजूर केला आहे. पण त्याची अंमलबजावणी होत नाही.

Web Title: Diwali in Kalyan-Dombivali;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.