स्वातंत्र्याची कवाडे खुली करणारी दिवाळी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2016 11:41 PM2016-10-29T23:41:43+5:302016-10-29T23:41:43+5:30
अंधार दूर सारून चहूकडे प्रकाश उजळण्याचा सण म्हणजे दिवाळी. गेल्या काही वर्षांत दिवाळीचे स्वरूप बदलले, माध्यमे बदलली.. पण आजही समाजाच्या कानाकोपऱ्यात
- स्नेहा मोरे
अंधार दूर सारून चहूकडे प्रकाश उजळण्याचा सण म्हणजे दिवाळी. गेल्या काही वर्षांत दिवाळीचे स्वरूप बदलले, माध्यमे बदलली.. पण आजही समाजाच्या कानाकोपऱ्यात सण-उत्सवांच्या काळात ‘सेलीब्रेशन’बरोबरच समाजातील निसर्ग आणि सामाजिक जबाबदारीचा विचार करणाऱ्या व्यक्तीही आहेत. विलेपार्ले येथील आशिष कदम हे पेशाने कमर्शिअल आर्टिस्ट असून यंदा त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘फिडर लॅटर्न’ या हटके कंदिलांमुळे पिंजऱ्यात बंदीवान म्हणून राहणाऱ्या पक्ष्यांसाठी यंदाची दिवाळी स्वातंत्र्याची कवाडे खुली करणारी ठरत आहे.
विलेपार्ले येथे राहणारे आशिष कदम यांनी यंदाची दिवाळी वेगळ्याप्रकारे साजरी करण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे, वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास सुरू
होतो आणि मग अचानकच वेगळ्या प्रकारे कंदील बनविण्याचे सुचले. हा ‘फिडर लॅटर्न’च्या संकल्पनेचा जन्म त्यांच्या कुटुंबातील वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीवरून झाला. याविषयी आशिष कदम सांगतात की, कदम कुटुंबीयांमध्ये किंवा मग माझ्या मित्रपरिवारात कुणाचाही वाढदिवस
असला की वाढदिवसाच्या सेलीब्रेशनची व्याख्या वेगळीच असते. कुणाचाही वाढदिवस असल्यास त्या दिवशी क्रॉफर्ड मार्केटमधून पक्ष्यांची खरेदी केली जाते आणि मग हे पक्षी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडले जातात. त्या पक्ष्यांना बंदीवान आयुष्यात कायमचे निसर्गाच्या कुशीत विसावण्यासाठी मुक्त केले जाते. गेली अनेक वर्षे प्रत्येकाच्या वाढदिवशी सातत्याने हा नियमच जणू कदम कुटुंबीयांच्या अंगी बाणला आहे, असेही ते आवर्जून सांगतात. दिवसा पक्ष्यांचे घरटे आणि रात्री प्रकाशमय होणारा कंदील यंदा सर्वांचेच आकर्षण ठरत आहे.
फिडर लॅटर्नची संकल्पना भविष्यातही सुरू ठेवण्याचा मानस कदम यांनी व्यक्त केला आहे. शिवाय, यापुढील प्रकल्पांसाठीही निसर्गाचा विचार करून काम करायचे आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. या संकल्पनेतून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत होत आहे. त्यामुळे प्रत्येक मुंबईकराने अशा उपक्रमांमध्ये जागरूक नागरिक म्हणून सहभागी होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
‘फिडर लॅटर्न’चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा कंदील फुगा, टोपली, सुतळ आणि फेव्हिकॉल या साहित्यापासून बनविला जातो. साधारण: ३ ते ४ तास एवढा कालावधी एक कंदील बनवायला लागतो. संकल्पनेचे पहिलेच वर्ष असूनसुद्धा या कंदिलाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
या संकल्पनेंतर्गत पार्ल्यातील हनुमान मार्गावर कदम यांनी स्वखर्चातून ८ फुटांचा ‘फिडर लॅटर्न’ साकारला आहे, हा कंदील पार्लेकरांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या कंदिलांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम पक्ष्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांना देण्यात येणार आहे.