दिवाळी प्रांताप्रांतातली

By admin | Published: November 10, 2015 01:40 AM2015-11-10T01:40:38+5:302015-11-10T01:40:38+5:30

दिवाळी हा दिव्यांचा, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा उत्सव! लक्ष लक्ष दिवे उजळून घरोघरी सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना दिवाळीच्या निमित्ताने केली जाते

Diwali in the provinces | दिवाळी प्रांताप्रांतातली

दिवाळी प्रांताप्रांतातली

Next

पुणे : दिवाळी हा दिव्यांचा, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा उत्सव! लक्ष लक्ष दिवे उजळून घरोघरी सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना दिवाळीच्या निमित्ताने केली जाते. महाराष्ट्राप्रमाणेच भारतातील इतर प्रांतांमध्येही दिवाळी वेगवेगळया पद्धतींनी धूमधडाक्यात साजरी केली जाते. दिवाळी साजरी करण्यामागच्या आख्यायिका, प्रथा वेगवेगळ्या असल्या तरी जल्लोष, आनंद आणि उत्साह हा प्रमुख उद्देश असतो. त्यामुळे ‘दिवाळी सण मोठा, आनंदाला नाही तोटा’ असे म्हणत दिवाळी साजरी करण्याच्या विविध पद्धतींचा घेतलेला धांडोळा!
पंजाब
शीखांचे सहावे गुरू हरराय यांच्यासह ग्वाल्हियरच्या राजाच्या कैदेतून सुटलेले गुंजा राजे अमृतसरला परतले. त्या वेळी त्यांच्या आगमनाचा आनंद अमृतसरमधील दरबारसाहिब अर्थात सुवर्ण मंदिरामध्ये दीपमाळा लावून साजरा करण्यात आला. तेव्हापासून पंजाब प्रांतात दिवाळी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. पूर्वी दीपोत्सव साजरा करताना शुद्ध तुपाच्या पणत्या लावल्या जात. आजकाल मोहरीचे तेल वापरून दिवे लावले जातात. घरोघरी, इमारतींवर दिव्यांच्या माळा लावल्या जातात. संध्याकाळच्या वेळी घरी किंवा गुरुद्वारामध्ये पाठ, अरदास करून सुख, शांतीसाठी प्रार्थना केली जाते. त्यानंतर मोकळया जागेमध्ये अनेक जण एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देतात. रात्रीच्या जेवणामध्ये तांदळाची खीर, कढा (शिरा), छोले, बटुरे असा बेत आखला जातो, अशी माहिती अमरिक सिंग यांनी दिली.
पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालमध्ये दिवाळी दोन दिवस साजरी केली जाते. पहिला दिवस कालिपूजा म्हणून साजरा केला जातो. कालिमातेच्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चा केली जाते. या पूजेला ‘श्यमापूजा’ असेही म्हणतात. जगातल्या वाईट शक्ती नष्ट व्हाव्यात आणि सौजन्याचे राज्य यावे, अशी प्रार्थना या वेळी केली जाते. कालिमातेला गाजा, नारळाचे लाडू, असा नैवेद्य दाखवला जातो. यंदा १० नोव्हेंबरला रात्री आठदरम्यान या पूजेला सुरुवात होणार आहे. पूजेची सकाळी सांगता झाल्यानंतर घरी जाऊन पणत्या लावल्या जातात, फटाके फोडले जातात, एकमेकांना मिठाई वाटली जाते. यादिवशी पांढऱ्या-लाल रंगाचे पेहराव परिधान केले जातात. दोन दिवसांचा हा सण धूमधडाक्यात साजरा केला जातो, अशी माहिती लाहोरी चक्रवर्ती हिने दिली.

ओरिसा
दिवाळीच्या निमित्ताने ओरिसामध्ये लक्ष्मीपूजनाला अतिशय महत्त्व असते. सकाळच्या वेळी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर संध्याकाळी विशिष्ट दिवे लावून पितृपुरुषांचे श्राद्ध केले जाते. त्यानंतर पहिला दिवा तुळशीसमोर, दुसरा दिवा घरातील देवासमोर लावला जातो. त्यानंतर घराचे प्रवेशद्वार दिवे आणि पणत्यांनी उजळून टाकले जाते, असे पुलिका महापात्रा हिने सांगितले. दिवाळीच्या दिवशी ‘पिठ्ठा मिठा’ पदार्थ बनवले जातात. यामध्ये अडिस्सा, काकरा, तांदळाची खीर, रव्याची खीर अशा पदार्थांचा समावेश असतो. त्यानंतर संध्याकाळी नवीन कपडे परिधान करून सर्वत्र मिठाई वाटली जाते आणि फटाके वाजवून जल्लोष केला जातो.
आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेशात लक्ष्मीमातेच्या मंदिरात जाऊन भव्य दिव्य स्वरूपात पूजा केली जाते. या वेळी सोनेरी किनार असलेला पांढराशुभ्र पेहराव परिधान केला जातो. हिरव्या रंगाच्या काड्यांना कापसाचे बोळे लावून ‘आईल ट्री’ लावले जातात. त्यानंतर फटाके वाजवले जातात. संध्याकाळी पंचपक्वानांचा बेत आखला जातो, अशी माहिती शशिकांत नायडू यांनी दिली.
उत्तर प्रदेश
आम्ही महाराष्ट्रीयन पद्धतीनेच दिवाळी साजरी करतो. नवीन कपडे, फटाके, घराची सजावट हे संपूर्णपणे महाराष्ट्रीयनच असते. मात्र, महाराष्ट्रात ज्याप्रमाणे दिवाळीच्या फराळाचे पदार्थ बनविण्यात येतात. ते पदार्थ न बनविता आम्ही रसगुल्ला आणि इतर मिठाई बनवितो. तसेच गुजिया हा आमचा पारंपरिक पदार्थ खास दिवाळीसाठी बनवितो. मागील ६ वर्षांपासून आम्ही पुण्यात असून, आमचे एकत्र कुटुंब आहे. त्यामुळे इतरांप्रमाणेच आम्ही हा मराठी सण साजरा करत मित्रमंडळी आणि नातेवाइकांसोबत एकत्रितपणे साजरा करत असल्याचे अलाहाबाद येथील प्रशांत राय याने सांगितले.
तमिळनाडू
दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाची पूजा आपल्याकडे संध्याकाळी होते; मात्र दक्षिणेकडे हे लक्ष्मीपूजन सकाळीच करण्याची पद्धत आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये आंघोळीसाठी उटणे वापरण्याची पद्धत आहे. मात्र, दक्षिणेकडे उटणे लावले जात नाही. आकाशकंदील, पणत्या, नवीन वस्तूंची खरेदी आणि फराळाचे पदार्थ हे महाराष्ट्रीयन पद्धतीचेच असते. मात्र, आम्ही मागील अनेक वर्षांपासून पुण्यात असल्याने आम्ही महाराष्ट्रीयन पद्धतीनेच दिवाळी साजरी करतो, असे दक्षिण भारतीय संदीप आर. पिल्ले यांनी सांगितले.
मध्य प्रदेश
या प्रदेशात दिवाळीच्या निमित्ताने महावीरांच्या मंदिरात जाऊन नारळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवला जातो. सर्वांनी मिळून जल्लोष करण्याचा, शुभेच्छा देण्याचा, गोड-धोड पदार्थांचे वाटप करण्याचा हा उत्सव मानला जातो. दिवाळीच्या दरम्यान देवाला मोक्ष मिळाला, असे त्या परिसरात मानले जाते. मंदिरातील पूजा करून घरी आल्यानंतर मटरी, गुलाबजाम, दालबाटी अशा पदार्थांवर ताव मारला जातो. माव्याच्या मिठाईला दिवाळीत मोठ्या प्रमाणात मागणी असते. संध्याकाळी घरोघरी, दुकानांमध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. दुकानदार पूर्ण बाजारपेठेत विद्युत रोषणाई करून मिठाई वाटतात आणि शुभेच्छा देतात, अशी माहिती अनुष्का जैन हिने दिली.
गुजरात
मूळची गुजरात येथील असलेली निकिता शहा दिवाळी साजरी करण्याबाबत म्हणाली, की स्वत:चा व्यवसाय असल्याने आमच्याकडे दिवाळीतील धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन याला विशेष महत्त्व आहे. तसेच दिवाळी साजरी करण्याची पद्धत सारखीच असून, चिरोटा आणि शेव हे आमच्याकडील महत्त्वाचे पदार्थ करतात. त्याचप्रमाणे मिठाई आणि सुकामेव्याला आमच्याकडे जास्त महत्त्व असल्याने या पदार्थांची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होते.

Web Title: Diwali in the provinces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.