दिवाळीला चायवेलीची भाकर,चवळीची भाजी
By admin | Published: November 2, 2016 02:53 AM2016-11-02T02:53:30+5:302016-11-02T02:53:30+5:30
दारु, ताडी, चायवेलीची भाकर, चवळी, डांगर, बोेंबलाची भाजी खाऊन आनंदात दिवाळी साजरी करीत असतात़.
विक्रमगड : या परिसरातील आदिवासींच्या दिवाळीला लाडु, करंज्या, कडबोळी, शंकरपाळे, चकली यांची जरुरी नसते़ कारण ते दारु, ताडी, चायवेलीची भाकर, चवळी, डांगर, बोेंबलाची भाजी खाऊन आनंदात दिवाळी साजरी करीत असतात़.
येथील आदिवासी पारंपारिक व निसर्गाशी एकरुप होउन दिवाळी साजरी करीत असतो़ आपटयाच्या पानाप्रमाणे जोडलेली याच वेलीची पाने आणि झाडांच्या सुकलेल्या फांद्यांचा भारा आदिवासी महिला दिवाळीसाठी जंगलातून आणतात़ आपल्या शेतात पिकविलेले भात उखळातून कांडून आणि सुपातून पाखडून त्यातून तांदुळ काढतात.़ घरातील जात्यावर ते दळून त्याचे पीठ करतात़. शेताच्या बांधावर लावलेल्या काकडीच्या वेलावरची मोठी काकडी घेऊन ती मधोमध उभी कापतात़ नदीतील शिंपल्याने ती खरवडून काकडीचे तुकडे दळलेल्या पिठात मळून घेतात़ चायवेलीच्या पानाच्या आकारा एवढा पिठाचा गोळा घेऊन चायवेलीच्या पानात थापून घेतात़ लाकडे चुलीत पेटवून मोठया पातेल्यात चायवेलीच्या पानावरील भाकरी उकडून घेतल्या जातात़ लालभोपळा(डांगर)कापून, चवळी आणि बोंबील यांची भाजी करतात़ भाजी-भाकरीचा हा पदार्थ दिवाळीत आदिवासींच्या घराघरात तयार केला जातो़
दिवाळीत घरातील कुलदेवतेला धुवून आणि पुसून त्यांना शेंदूर लावतात. तेलाचा दिवा पेटवून चायवेलीच्या भाकरी व डांगर, चवळी, बोंबलाच्या भाजीचा नैवेद्य दाखवितात. त्यानंतर देवावर दारुची अथवा ताडीची धार टाकतात. सर्व लहान मोठी माणसे एकमेकांना घास भरवून मिठी मारुन भेट घेतात़
भगत हा भक्तांना व गावदेवाला आणि वाघ्या देवाला घेवून मिरवतात़. यावेळी दारु, ताडीची धार चाखून चायवेलीची भाकरी व भाजी देवाला वाहतात. गावातील दु:ख, दैन्य, दारिद्रय व रोगराई घालवून टाक, अशी प्रार्थना करतात़. काही आदिवासी नरक चतुर्दशीपासुन तीन दिवस पारंपारिक पध्दतीने दिवाळी साजरी करतात़ पाडव्याच्या दिवशी गावा-गावातील गुराखी गुरांच्या शिंगाला कुटलेले पीठ लावतात. मुठीच्या सहाय्याने पिठाच्या द्रावणाचे ठसे जनावरांच्या अंगावर उमटवतात़. नंतर वेशीपाशी पालापाचोळा व गवत पेटवून त्या आगीतून जनावरे पळविली जातात. आदिवासी महिला तांदुळ कांडुन ते पाण्यात भिजवतात आणि घराच्या दर्शनी भागावर हाताच्या मुठींनी ठसे उमटवतात़
>शेणाचा वा चिबुडाचा दिवा
आदिवासी पणती म्हणजे कोडया मिळाला नाही तर शेणाचा दिवा किंवा चिबुड कापून दिवा करतात़ त्यात तेल टाकून तो पेटवितात़ झेंडुच्या फुलांना आदिवासी मखमलीची फुले असे म्हणतात ़ती फुले, लोंगर आणि आंब्याची पाने यांच्या माळा करुन घरच्या दर्शनी भागात लावतात़ गरीब आदिवासीही आपल्या मुलांना दिवाळीत नवीन कपडे घेत असतो़