केदारच्या खेळीनंतर परमहंसनगरमध्ये साजरी झाली दिवाळी

By admin | Published: January 17, 2017 12:55 AM2017-01-17T00:55:28+5:302017-01-17T00:55:28+5:30

क्रिकेटपटू केदार जाधव याच्या धमाकेदार खेळीने इंग्लडवर मात केल्यानंतर सोमवारी कोथरूडमधील परमहंसनगरमध्ये जणू दिवाळीच साजरी करण्यात आली़

Diwali was celebrated in Paramahansnagar after Kedar's game | केदारच्या खेळीनंतर परमहंसनगरमध्ये साजरी झाली दिवाळी

केदारच्या खेळीनंतर परमहंसनगरमध्ये साजरी झाली दिवाळी

Next


पुणे : क्रिकेटपटू केदार जाधव याच्या धमाकेदार खेळीने इंग्लडवर मात केल्यानंतर सोमवारी कोथरूडमधील परमहंसनगरमध्ये जणू दिवाळीच साजरी करण्यात आली़ अनेकांनी केदार जाधव याच्या आईवडिलांची भेट घेऊन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला़
केदार जाधव याची किक्रेटची कारकीर्द पुण्यातूनच सुरू झाली़ घरची क्रिकेटची पार्श्वभूमी नसतानाही, वडील महादेव जाधव आणि आई मंदाकिनी जाधव यांच्या पाठिंब्याच्या जोरावर केदारने यश मिळविले आहे़ २६ मार्च १९८५ रोजी जन्मलेला केदार आपली आई, वडील, पत्नी स्रेहल जाधव आणि दोन वर्षांची एक मुलगी यांच्या समवेत सध्या कोथरूडमध्ये राहतो़ केदारने महाराष्ट्र, वेस्ट झोन, बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन यांच्यातर्फे खेळतानाही आपल्या आक्रमक खेळाची चुणूक दाखविली आहे़
झिम्बाब्वेमधील मालिका, आॅक्टोबर २०१६ मधील न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकांमध्ये तो सहभागी झाला होता़ आतापर्यंत त्याला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करण्यात यश मिळाले नव्हते़ पण, रविवारी आपल्या होम पिचवर त्याला खऱ्या अर्थाने सूर गवसला आणि तो एक अविस्मरणीय खेळी करून गेला़ पुण्यातील क्रिकेटपटूने अशी धमाकेदार खेळी आणि तीही पुण्यात करण्याची पहिलीच वेळ होती़
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोथरूड विभागाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी केदार राहत असलेल्या परमहंसनगरमधील प्रसाद अपार्टमेंटमध्ये रांगोळी काढून त्यात केदार तुझा सार्थ अभिमान आहे़ केदार १२० अशी रांगोळी काढण्यात आली़ पणत्या पेटविल्या़ त्यानंतर त्यांनी पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या आईवडिलांना खाली बोलविले़ आपल्या इमारतीच्या दारात रांगोळी आणि पणत्या पाहून तेही हरखून गेले़ सुधीर धावडे, अ‍ॅड़ किशोर शिंदे, प्रशांत कनोजिया, राहुल मारणे, अमित राऊत, विराज डाखवे, कौस्तुभ गोडबोले आदींनी त्यांना पेढे भरविले़
>केदारच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान
सुरुवातीपासूनच केदारला क्रिकेटचे भरपूर वेड होते. त्याच्या या छंदाला आडकाठी न आणता त्याला पाठिंबा दिला. भारतीय संघाच्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या घरच्या मैदानावर केलेली उल्लेखनीय कामगिरी महत्त्वाची असून, त्याच्या कामगिरीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशी भावना केदार जाधवची मोठी बहीण चारुलता पाटील यांनी व्यक्त केली.
केदारने आपल्या करिअरची सुरुवात करताना प्रथम न्याय क्रिकेटला दिला. त्याच्या कुठल्याही निर्णयप्रक्रियेत आडकाठी आणली नाही. पहिल्यापासून केदारला क्रिकेटची आवड होती. आम्ही त्याच्या करिअरमध्ये कुठलीही आडकाठी आणली नाही. त्याला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. जे क्षेत्र निवडशील त्यात नाव कमव इतकीच आमची अपेक्षा होती. होमग्राऊंडवर सामना असल्याने त्याच्यात आत्मविश्वास दिसत होता, असे त्या म्हणाल्या.
गहुंजेच्या येथील सामन्याच्या पुर्वसंधेला केदार संक्रांतीसाठी घरी आला होता. आम्ही सर्वांनी मिळून सणही साजरा केला. सामन्याबद्दल अधिक चर्चा न करता आम्ही सणाचा आनंद लुटत त्याला शुभेच्छा दिल्या, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Diwali was celebrated in Paramahansnagar after Kedar's game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.