राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सणाआधीच वेतन देण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 05:35 AM2022-10-19T05:35:16+5:302022-10-19T05:35:51+5:30
सणापूर्वी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन आणि निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. येत्या २२ तारखेपासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणापूर्वी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन आणि निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एरव्ही ऑक्टोबरचे वेतन नोव्हेंबरमध्ये होत असते. मात्र दिवाळी २२ ऑक्टोबरपासून असल्यामुळे दिवाळी खरेदी व इतर कारणांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे व अकृषी विद्यापीठे यातील कर्मचाऱ्यांनाही होणार आहे. यासाठी वेतन देयके त्वरित कोषागार कार्यालयात दाखल करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच शिक्षक, शिक्षकेतरांना ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वीच देण्यात येणार आहे. यंदा दिवाळी ऑक्टोबरच्या अखेरीस आल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी साजरी करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
हे लक्षात घेता शिक्षक भारतीने उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार अर्थ विभागाने १८ ऑक्टोबरला शासन निर्णय जारी करत पगार दिवाळीपूर्वी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होईल, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.