यंदाची दिवाळी काळी दिवाळी साजरी होणार! - अजित पवार
By Admin | Published: October 20, 2016 06:22 PM2016-10-20T18:22:04+5:302016-10-20T18:29:55+5:30
घोषणाबाज सरकार या सर्वांचा विचार केला असता केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे संवेदनशिल नाही म्हणून यंदाची दिवाळी ही काळी दिवाळी साजरी होणार की काय
आप्पासाहेब पाटील
सोलापूर, दि. २० - शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, सत्तेतील मंत्र्यांची शिवराळ भाषा़, वादग्रस्त विधाने, सत्ताधाऱ्यांच्या तोंडाला लगाम नाही, घोषणाबाज सरकार या सर्वांचा विचार केला असता केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे संवेदनशिल नाही म्हणून यंदाची दिवाळी ही काळी दिवाळी साजरी होणार की काय अशी भिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली़
आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अक्कलकोट येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता़ त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर आ़ दिलीप सोपल, जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे-पाटील, जि़प़च्या अध्यक्षा जयमाला गायकवाड, माजी आ़ महादेव पाटील, सोमपाचे उपमहहापौर प्रविण डोंगरे, ठाण्याचे माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार, फारूख शाब्दी, मल्लिकार्जुन पाटील, दिलीप कोल्हे, प्रदीप गारटकर, दिलीप सिध्दे, नगराध्यक्ष रमेश बारसकर, अभिजित ढोबळे, मकरंद निंबाळकर, राजीव क्षीरसागर, महानंदा स्वामी, अजिंक्यराणा पाटील, शिवाजी राजेगांवकर, प्रदीप जगताप, युवती जिल्हाध्यक्ष यशोदा ढवळे, आप्पाराव कोरे, खाजा पठाण, किरण केसूर आदी उपस्थित होते़
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या बळीराजा देशात असमाधानी आहे़ शासनाचा कारभार उदासीन आहे़ आघाडीच्या काळात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने ग्रामस्वच्छताबरोबर अनेक कामे लोकसहभागातून मार्गी लावले़ गुंड प्रवृत्तीच्या माणसांना मुख्यमंत्री फडणवीस भाजपात प्रवेश देतात ही खेदाची बाब आहे़ यामुळे पुरोगामी विचाराला तडा जात आहे़ अच्छे दिनाच्या नावाखाली देशात व राज्यात सत्तेवर आलेले सरकार फसवे निघाले आहे़ अत्याचार, बलात्कार, पोलीसांवरील हल्ले वाढलेले आहेत़ यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ कोपर्डी सारखे घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या यास राष्ट्रवादीचे सर्वच खासदार पाठींबा देतील अशीही ग्वाही पवार यांनी यावेळी दिली़.
धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत आदी समाजाचे मोर्चे निघत आहेत़ याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे़ ५१ टक्के आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळाले पाहिजे़ देशाच्या इतिहासात मराठा समाजाचा सर्वात मोठा मोर्चा औरंगाबादपासून निघाला़ शासनाने त्याची दखल घेतली नाही म्हणून समाजामध्ये अस्वसस्था आहे़ विजय मल्लयांनी ९ हजार कोटी कर्ज बुडविला़ आगामी जि़प़ व पं़स़निवडणुकीत विविध जाती धर्मांना सामावून घेऊन क्षमता पाहावून उमेदवारी द्या, गटातटाला मुठमाती देऊन राष्ट्रवादी पक्षावर निवडणुक लढा, मतभेद ठेवू नका, गटातटाला संपविण्यासाठी मी सक्षम आहे़ अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी ऩप निवडणुकीसाठी स्वबळावर उमेदवार उभा करा, राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय देशात पर्याय नाही पण त्यात मोठा बदल झाला़ मी एकदा बोलून चुकलो त्याचा पश्चाताप केला आहे़ काम करणारा चुकतो असेही पवार यांनी सांगितले़