मेंदूतील गाठीमुळे चालकाला चक्कर
By admin | Published: May 26, 2017 04:14 AM2017-05-26T04:14:00+5:302017-05-26T04:14:00+5:30
उमा टॉकीज चौकात बुधवारी (दि. २४) झालेल्या एस. टी.अपघातप्रकरणी चालक रमेश सहदेव कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उमा टॉकीज चौकात बुधवारी (दि. २४) झालेल्या एस. टी.अपघातप्रकरणी चालक रमेश सहदेव कांबळे (वय ४२, रा. कांडगाव, ता. करवीर) याच्यावर येथील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवून वाहनचालकांच्या मृत्यू व जखमीस कारणीभूत केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. कांबळे याची सीपीआर रुग्णालयात तपासणी केली असता त्याच्या डोक्यातील मेंदूत गाठ (बे्रन ट्यूमर) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या मेंदूतील गाठीमुळे मनुष्याला चक्कर येणे, फिटस् येण्याचा त्रास संभवतो, त्यातून ही दुर्घटना घडल्याची शक्यता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी गुरुवारी बोलून दाखविली.
बुधवारी सायंकाळी हुपरी ते रंकाळा या एस. टी. बसने कोल्हापुरात उमा चित्रमंदिर चौकात सिग्नलला थांबलेल्या वाहनांना पाठीमागून चिरडले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर दहा वाहनधारक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात रिक्षा, चारचाकीसह एकूण १४ वाहनांचा चक्का चुराडा झाला. अपघातावेळी कांबळे हा बेशुद्धावस्थेत होता, त्यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची चर्चा होती; पण दुर्घटनेनंतर दोन तासांतच सीपीआरमध्ये उपचार घेताना चालक कांबळे शुद्धीवर आला, त्यावेळी त्याने काय घडले, कसे घडले, येथे कसा आलो? याची काहीही कल्पना नसल्याचे उत्तर दिले. त्याने मद्यसेवन केले नव्हते, हे चाचणीतून स्पष्ट झाले आहे.
या अपघातप्रकरणी बसचालक रमेश सहदेव कांबळे यांच्यावर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती गुरुवारी एस. टी.चे कोल्हापूर विभाग नियंत्रक नवनीत भानप यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
रक्ताला चटावलेली बस
कोल्हापूरातील उमा टॉकीज चौकात बुधवारी १४ वाहनांना चिरडणारी बस मुळची साताऱ्याची आहे. याच बसचे अपहरण करुन संतोष माने याने पुण्यात गर्दीत घुसवून अनेकांना चिरडले. होते. विशेष म्हणजे, दोन्ही अपघात बुधवारीच झाले आहेत. त्यामुळे रक्ताला चटावलेली बस असे तिचे नामकरण काल कोल्हापुरात घटनास्थळी जमलेल्या बघ्यांनी करुन टाकले. याची चर्चा आज साताऱ्यातही होती. ही एसटी बस (एमएच १४ बीटी १५३२) २०१२ पूर्वी सातारा विभागाच्या ताफ्यात होती.