डीजे, आवाज वाढवू नको...

By admin | Published: August 30, 2016 02:12 AM2016-08-30T02:12:15+5:302016-08-30T02:12:15+5:30

‘आवाज वाढव डीजे’ म्हणत तीव्र क्षमतेच्या ध्वनिक्षेपकासमोर थिरकणे तुमच्या जिवावर बेतू शकते. आवाजाच्या दणक्यामुळे शुद्ध हरपण्याबरोबरच जीव जाण्याचा धोका

DJ, do not raise voice ... | डीजे, आवाज वाढवू नको...

डीजे, आवाज वाढवू नको...

Next

विशाल शिर्के,  पुणे
‘आवाज वाढव डीजे’ म्हणत तीव्र क्षमतेच्या ध्वनिक्षेपकासमोर थिरकणे तुमच्या जिवावर बेतू शकते. आवाजाच्या दणक्यामुळे शुद्ध हरपण्याबरोबरच जीव जाण्याचा धोका असल्याचे दहीहंडीतील एका घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात तरी आपण यापासून धडा घेणार की नाही, असा प्रश्न आपणच आपल्याला विचारायला हवा.
दहीहंडीत डीजेच्या कानठळ्या बसविणाऱ्या डीजेसमोर थिरकणाऱ्या एका मंडळातील दोन कार्यकर्त्यांची शुद्ध हरपल्याची घटना धनकवडी गावठाण येथे घडली. या कार्यकर्त्यांच्या हृदयाचे ठोके वाढल्याने त्यांना एक दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले. इतकेच काय, तर त्यांच्या हृदयाचे ठोके पूर्ववत होण्यास तब्बल १२ तास लागल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दहीहंडी, गणेशोत्सव व नवरात्रात कर्णकर्कश डीजेच्या तालावर नाचण्याचा प्रघात गेल्या काही वर्षांत पडला आहे. अत्याधुनिक पद्धतीचे ध्वनिवर्धक लावून मोठ्या प्रमाणावर आवाज सोडण्याची चढाओढ मंडळांमध्ये लागल्याचे दिसून येते. ही दहीहंडीदेखील त्याला अपवाद ठरली नाही. शहर मध्य वस्ती असो की उपनगरातील भाग; सार्वजनिक मंडळे २०-२० फुटांच्या अंतरावर दिसून येतात. त्यामुळे हा आवाजाचा दणका कितीतरी पटींनी वाढतो.
मात्र, अशा ध्वनिवर्धकाचा आवाज जिवावरदेखील बेतू शकतो, याचे उदाहरण समोर आले आहे. धनकवडी गावठाणातील एका मंडळातील दोन २१ व २२ वर्षांच्या कार्यकर्त्यांवर डीजेच्या आवाजामुळे शुद्ध हरपण्याची वेळ आली. धनकवडी गावठाणातील सह्याद्रीनगर परिसरात जवळजवळ असलेल्या दोन मंडळांत ध्वनिक्षेपकाची चढाओढ चालू होती. त्या गोंगाटात ठराविक अंतराने दोन जणांची शुद्ध हरपली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले तेव्हा, त्यांच्या हृदयाचे ठोके वाढल्याचे लक्षात आले. तसेच, त्यांचा रक्तदाबदेखील व्यवस्थित येत असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. त्यांचे ठोके सामान्य होण्यासाठी तब्बल १२ तास लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याबाबत संबंधित तरुण व त्यांच्या पालकांशी संपर्क साधला असता, त्यांनी स्वत:चे व मंडळाचे नाव छापण्यास नकार दिला. यांतील एका तरुणाने ध्वनिवर्धकामुळे त्रास झाल्याची शक्यता मान्य केली; मात्र त्याला पूर्वी फिट्सचा त्रास होत होता. तो मधल्या काळात बंद झाला होता. त्यामुळे पुन्हा तसाच त्रास झाल्याची शक्यता व्यक्त केली. तर, दुसऱ्या एका तरुणाने दिवसभर काहीही न खाता मंडळात काम केल्याने व त्यानंतर तसेच डीजेच्या तालावर थिरकल्याने त्रास झाल्याचे सांगितले. याशिवाय, १५ दिवसांपूर्वी डेंगी झाल्याने अशक्त असल्याचेदेखील त्याने सांगितले.

1दणक्यातील आवाजामुळे, विशेषत: डीजेतील ‘हुपर’मुळे हृदय धडधडते. त्यामुळे हृदयाची पूर्णत: उघडझाप होत नाही. ते केवळ फडफडल्यासारखे करते. परिणामी मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्याने मेंदूला आॅक्सिजनची कमतरता निर्माण होते. त्यामुळेच शुद्ध हरपते.
2अशा परिस्थितीत रुग्णावर चोवीस तास लक्ष ठेवावे लागते. जर हृदयाचे ठोके पूर्ववत न झाल्यास जीवावरदेखील बेतू शकते, असे डॉ. प्रवीण दरग म्हणाले.

आवाजाची तीव्रता व त्याचा कानावर पडणारा कालावधी महत्त्वाचा असतो. तसेच एखादी व्यक्ती जर आवाजाप्रती संवेदनशील असेल, तर त्या व्यक्तीला तुलनेने कमी तीव्रतेच्या आवाजानेदेखील कानाच्या पडद्याला दुखापत होऊ शकते. साधारण शंभर डेसिबल व त्यापेक्षा अधिकचा आवाज निश्चित दुखापत करणारा असतो. जर एखाद्या व्यक्तीच्या कानावर दीडशे डेसिबलचा आवाज दोन मिनिटे पडल्यास त्याला हमखास त्रास होऊ शकतो. जर आपल्याला तीव्र आवाजातील डीजे वाजवायचाच असेल, तर किमान दोन गाण्यांनंतर पंधरा ते वीस मिनिटांची विश्रांती घेण्याची दक्षता घेतली पाहिजे.
- रवींद्र सरदेसाई, कान, नाक, घसातज्ज्ञ

Web Title: DJ, do not raise voice ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.